आवाशी येथे ग्रामदेवतेचा त्रैवार्षिक जत्रोत्सव

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील आवाशी गावचे ग्रामदैवत केदारनाथ, काळकाई, वाघजाई, झोलाई, मानाई, चंडिका, पार्वती, नवसरी व गांगोजी देवतांचा त्रैवार्षिक जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव ५.  व . ६ मे  या कालावधीत होणार आहे.
 खेड तालुक्यातील आवाशी ग्रामदेवतेच्या यात्रेला रविवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. ग्रामदेवतेची परडी घेऊन लगतच्या शेल्डी गावात लक्ष्मण माने यांच्या येथे लाटेचे पूजन करून लाट तोडली जाईल. दुपारी शेल्डी, गोठलवाडी, मठवाडी, ढाकरवाडी, देऊळवाडी, कापवाडी, हनुमाननगर, गणवाल या गुणदे गावच्या हद्दीतून आवाशी मंदिराकडे प्रस्थान होईल. सायंकाळी गोव्यावर लाट चढविल्यानंतर रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडेल, दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरातील विधिवत पूजा झाल्यावर गुणदे (निमई), शेल्डी (खालचा आठआणे), गुणदे (मठवाडी), कोतवली व लवेल या निमंत्रित पालख्यांचे आगमन, पूजन, भेटीचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी लाट फिरवून जत्रेची सांगता होणार आहे.