रायगड लोकसभेसाठी खेड तालुक्यातील १ लाख ४८ हजार २५९ मतदार बजावणार मतदानाचा हक्क !

खेड (प्रतिनिधी)  येत्या ७ मे २०२४ रोजी होणाऱ्या रायगड लोकसभा मतदार संघासाठी खेड तालुक्यातील समाविष्ट असणारे दापोली व गुहागर . विधानसभा मतदार संघांतील १ लाख ४८ हजार २५९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे सुनिल तटकरे व इंडिया विकास आघाडीचे अनंत गीते यांच्यातच तुल्यबळ सामना होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मतदार संघ पुनर्रचनेनुसार खेड़ विधानसभा मतदार संघ हा दापोली विधानसभा व गुहागर विधानसभा मतदार संघ असा दोन विधानसभा मतदार संघात विभागला गेला आहे. खेड तालुक्यातील १०४ मतदान केंद्रे दापोली विधानसभा मतदार संघात येत असून याठिकाणी ३८ हजार ६५६ पुरुष आणि ४० हजार ४०५ स्त्रिया असे ७९ हजार ५७ मतदार आहेत तर खेड तालुक्यातील ९० मतदान केंद्रे गुहागर विधानसभा मतदार संघात येत असून याठिकाणी ३३ हजार ९९० पुरुष आणि ३५ हजार २१२ स्त्रिया असे ६९ हजार २०२ मतदार आहेत. असे एकूण खेड तालुक्यातील १ लाख ४८ हजार २५९ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
खेड तालुक्यातील दापोली व गुहागर विधानसभा मतदार संघात समाविष्ट असणाऱ्या एकूण १९४ मतदान केंद्रावर प्रत्येकी केंद्राध्यक्ष १, पोलींग ३, शिपाई १, पोलीस कर्मचारी १, स्वयंसेवक २ व बीएलओ १ असे एकूण ९ कर्मचारी मतदानादिवशी तैनात करण्यात आले आहेत. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गुहागर विधानसभा मतदार संघातील मतदान पेट्या खेड तालुक्यातील लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालय व दापोली विधानसभा मतदार संघातील मतदान पेट्या दापोली येथील कृषि विद्यापिठात पाठण्यात येणार आहेत.
मतदान सुरळीत पार पडेपर्यंत भरारी पथकाच्या चार टीम तैनात करण्यात आल्या असून दापोली विधानसभा मतदान केंद्रात येणाऱ्या गावांसाठी खेड तालुक्यातील विन्हेरे फाटा व दस्तुरी तर गुहागर विधानसभा मतदान केंद्रात येणाऱ्या गावांसाठी खेड तालुक्यातील खोपी फाटा याठिकाणी फिल्ड सर्वेक्षण करण्यात येत आहे, तर. एफ.एस.टीव्ही व व्ही.एस.टी.ची तीन व्हिडिओ पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती येथील निवडणूक नायब तहसिलदार अमित इंगळे यांनी दिली