जेष्ठ कलाकार विजय डाफळे यांचे दुःखद निधन

 

 

रत्नागिरी : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य आणि रत्नागिरीतील कलाकार विजय डाफळे यांचे अल्पशा आजाराने काल रात्री दुःखद निधन झाले. डाफळे हे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला होते, परंतु त्यांचा ओढा हा कलाक्षेत्राकडे होता.

पंडित भीमसेन जोशी हयात असतांना प्रत्येक वर्षी दर गुरुपौर्णिमेला ते त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे आशीर्वाद घेऊन येत असत. पंडितजींच्या निधनानंतर त्यांच्या जयंतीचा कार्यक्रम ते नियमितपणे आपल्या निवासस्थानी स्थानिक कलाकारांना बोलवून साजरा करत असत. डाफळे हे व्यायाम पटू देखील होते यामुळे शरीर संस्था क्षेत्रांमध्ये त्यांना मोठा सन्मान होता.

संगीत क्षेत्राची त्यांना आवड आणि कलेची चांगली जाण होती. तो काळ रेकॉर्ड प्लेअर चा होता. त्यावेळच्या सर्व हिंदी मराठी फिल्मच्या गाण्यांच्या रेकॉर्ड खरेदी करून त्याचा खूप मोठा संग्रह त्यांनी केला होता. त्याकाळी फार थोड्या लोकांकडे रेकॉर्ड प्लेअर असत.

सुप्रसिद्ध संगीतकार एस. डी. – आर. डी. बर्मन यांचे रिदम अरेंजर रत्नागिरी मिऱ्या गावचे सुपुत्र कै. मारुतीराव किर यांची आणि विजय डाफळे यांची चांगली मैत्री होती. कलाप्रेमी कै. मारुतीरावांची थोरवी ते प्रत्येक नवोदित कलाकारांना सांगून पटवून देत असत. विजय डाफळे कधी मुंबईत गेलेकी कै. मारुतीराव किर यांना ते न चुकता भेटत असत आणि कै. मारुतीराव त्यांना फिल्म रेकॉर्डिंग पहाण्यासाठी ऐकण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओत घेऊन जात असत.

“अगर तुम ना होते” या आर. डी. बर्मन यांनी संगीत दिलेल्या अभिनेत्री रेखा व राज बब्बर यांच्यावर चित्रित केलेल्या आणि जेष्ठ गायिका आशाबाई भोसले यांनी गायलेल्या “धीरे, धीर.. जरा, जरा.. जाने जाना, होने लगा.. तेरी मिठी बातो पे यकीन..” या गाण्याच्या रेकॉर्डिंग तसेच त्याकाळातील गाजलेली “शोले फिल्म” च्या बॅगराउंड म्युझिक रेकॉर्डिंग वेळी कै. मारुतीरावांबरोबर विजय डाफळे हे उपस्थित होते त्यांनी ते रेकॉर्डिंग पाहिलं व ऐकलं होतं.

त्याकाळी “ट्युनर्स मेलडी” हा ऑर्केस्ट्रा ग्रुप होता त्यात कै. राम गोवेकर, विजय डाफळे, अनिल किर ( रत्नागिरी व मुंबई आकाशवाणी चे निवेदक ) कै. सुरेश देसाई ( गोकुळ दूध, टिळक आळी चे मालक ) श्रीकांत निवसकर, मुकुंद नाटेकर, सुधीर पावसकर, विलास दवंडे, बाळू आंबेरकर, यशवंत पाध्ये, बंड्या मांडवकर अशा त्या काळातील दिगग्ज कलाकारांचा हा ऑर्केस्ट्रा ग्रुप होता. आर. डी. बर्मन यांचे पियानो, कीबोर्ड प्लेअर सुप्रसिद्ध कलाकार “केरसी लॉर्ड” यांच्या कडून विजय डाफळे यांनी त्याकाळी रत्नागिरीत प्रथम “अकॉडीयन” आणलं होतं..

रत्नागिरीतील संगीत क्षेत्रात असणारे त्यांचे मोठे योगदान कधीही विसरता येणार नाही. अक्षत या सांस्कृतिक संस्थेमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संघटनेचे काम देखील ते पाहत असत. त्यांचा मित्र परिवार सर्व क्षेत्रात होता.

विजय डाफळे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून रत्नागिरी च्या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.