खेड च्या खाडीपट्ट्यात मोबाईल सेवा कोलमडली

 

खेड)प्रतिनिधी) तालुक्यातील खाडीपट्ट्यात सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यान ग्रामस्थ हवालदिल झालेले असतानाच सतत खंडित होणाऱ्या खासगी मोबाईल कंपन्यांच्या सेवांमुळे ग्राहक मेटाकुटीस आले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून देखभाल दुरूस्तीच्या कामाचे कारण पुढे करत तासन्तास वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थ आधीच हैराण झालेले असतानाच त्यात मोबाईल कंपन्यांच्या सेवांचा पुरता बोजवारा उडाला असून कोणत्याही क्षणी मोबाईल कंपन्यांची सेवा खंडित होत असल्याने सेवा असून नसल्यासारखीच आहे. खाडीपट्ट्यात सर्वाधिक वस्ती असून बहुतांश ग्राहकांनी विविध कंपन्यांची मोबाईल सेवा खरेदी केली आहे. बीएसएनएलचे देखील तीन ठिकाणी टॉवर आहेत. मात्र या सेवेचा पुरता फज्जा उडाल्याने अन्य ग्राहकांनी खासगी मोबाईल कंपन्यांची सेवा खरेदी केली आहे. मात्र या सेवेतही सतत व्यत्यय येत असल्याने ग्रामस्थ मोबाईल कंपन्यांच्या सेवांना पुरते कंटाळले आहेत. खंडित सेवेबाबत तक्रार करण्यासाठी मार्गच नसल्याने पर्यायाने सेवा सुरळीत होण्याचीच ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत
आहे.