दापोली विधानसभा मतदार संघात ५७.३७ टक्के मतदान

 

दापोली | प्रतिनिधी : दापोली विधानसभा मतदारसंघातील ३७१ केंद्रावरील सर्व मतदान यंत्र निवडणूक साहित्य कर्मचाऱ्यांनी जमा केले असून त्याची पडताळणी झाली आहे.

३२ रायगड लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीतील सर्वच उमेदवारांचे भवितव्य व मतदान मशीन मध्य बंद झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते विरुध महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या थेट सामना होत असल्याने या मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची बनली आहे.

 

दापोली विधानसभा ३७१ केंद्रावरील सर्व मशीन्स निवडणुकीचे साहित्य घेऊन रात्री उशिरापर्यंत निवडणूक कर्मचारी सर विश्वेश्वरैया सभागृहासमोरील मंडपात दाखल झाले. या कर्मचाऱ्याकडून निवडणूक साहित्य गोळा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. सर्व मतदान मशीन्स निवडणूक साहित्य जमा झाल्याने त्याची पडताळणी करून पोलिस बंदोबस्तात सर्व व्होटिंग मशीन अलिबागकडे सुखरूप रवाना करण्यात आली आहेत.

 

दापोली मतदार संघासाठी १ लाख ३४ हजार ७६७ पुरुष मतदारांपैकी ७५ हजार ८१०, १ लाख ४५ हजार ४९४ महिला मतदारांपैकी ८४ हजार ९८८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून एकूण २ लाख ८० हजार २६१ मतदारां पैकी १ लाख ६० हजार ७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानांची अंतिम टक्केवारी ही ५७.३७ टक्के असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी दिली आहे.