मांदिवली पूल ५२ वर्षांचा; ऑडिट होत नसल्याची माहिती आरटीआयमधून उघड

दापोली (विशेष प्रतिनिधी) – दापोली तालुक्यातील केळशी परिसरातील मांदिवली पुलासंदर्भात माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून पुलाच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. श्री. विजय गणपत साबळे यांनी ३० ऑक्टोबर २०२३ रोजी दाखल केलेल्या आरटीआय अर्जास उपविभागीय अभियंता तथा माहिती अधिकारी पी. बी. कदम यांनी उत्तर दिले असून, त्यात पुलाच्या बांधकामाचा कालावधी, वहनक्षमता व दुरुस्तीबाबतची स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे.
आरटीआय उत्तरानुसार मांदिवली पूल सन १९७१ मध्ये बांधण्यात आला असून या पुलाला सध्या तब्बल ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, इतक्या दीर्घ कालावधीनंतरही या पुलाचे नियमित ऑडिट केले जात नसल्याची बाब उघड झाली आहे. संबंधित विभागाने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील पुलांचे स्वतंत्र ऑडिट होत नसून, केवळ वेळोवेळी दृश्य तपासणी किंवा नियमित निरीक्षण करण्यात येते. त्यामुळे पुलाची संरचनात्मक स्थिती तपासणारा सविस्तर ऑडिट अहवाल उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुलाच्या वहनक्षमतेबाबत माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की या पुलाची वजन पेलण्याची क्षमता ७० ते १०० मेट्रिक टन प्रति अॅक्सीस इतकी आहे. मात्र, अलीकडील काळात पुलावर कोणत्याही स्वरूपाची मोठी दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचीही नोंद उत्तरात करण्यात आली आहे. यामुळे पुलाच्या दीर्घकालीन टिकाऊपणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, पुलाच्या मूळ उद्देशाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर प्रशासनाकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा पूल प्रामुख्याने सार्वजनिक दळणवळण आणि प्रवासी वाहतुकीसाठी बांधण्यात आला होता. मात्र सध्या या पुलावरून मोठ्या प्रमाणावर खनिज, विशेषतः बॉक्साईटची जड वाहतूक सुरू आहे. पूर्वीची सामान्य वाहतूक आणि आताची अवजड वाहतूक यामध्ये मोठा फरक असून, त्यामुळे पुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
आरटीआयमधून समोर आलेल्या या माहितीनंतर स्थानिक नागरिकांकडून पुलाचे सखोल तांत्रिक ऑडिट करण्यात यावे, तसेच वाढलेल्या जड वाहतुकीचा विचार करून आवश्यक ती दुरुस्ती व सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. पुलाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.