मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे 9 मे रोजी मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग शिवराजेश्वर मंदिरात पारंपारिक शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवाजी महाराजांना घोष मानवंदना देण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गतवर्षी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भेटीत दिलेल्या सुचनेनुसार सिंधुदुर्गातील स्वयंसेवक संघातर्फे गतवर्षी पासून पारंपारिक शिवजयंतीला शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांना घोष मानवंदना देण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पारंपारिक शिवजयंती निमित्त जिल्ह्यातील स्वयंसेवक संघांचे पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर दाखल होत शिवराजेश्वर मंदिरात शिवरायांचे दर्शन घेतले. यावेळी महाराजांची पूजा अर्चा करून वस्त्र, श्रीफळ, पुष्पहार महाराजांना अर्पण करण्यात आला. यानंतर १६ स्वयंसेवकांच्या समूहामार्फत बँड वादन करून शिवरायांची महती सांगणारी शिवराज रचना सादर करून शिवरायांना घोष मानवंदना दिली. यानंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली. यावेळी शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ व पुजारी श्रीराम सकपाळ यांना पुष्पगुच्छ देऊन स्वयंसेवक संघातर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा संघचालक रविकांत हरी मराठे, जिल्हा कार्यवाह लवू महाडेश्वर, जिल्हा सहकार्यवाह पवन बांदेकर, कार्यक्रमाचे प्रमुख योगेश वारंग यांच्यासह बबन परुळेकर, रत्नाकर कोळंबकर, सुशांत तायशेटे व इतर स्वयंसेवक उपस्थित होते.












