खेड मधील धान्य गोदामाला हवाय ९१ लाख ६७ हजारा चा निधी

 

प्रतीक्षा नव्या इमारतीची , दोन वर्षानंतरही खेडमधील जमीनदोस्त शासकीय धान्य गोदामाचे बांधकाम रखडलेलेच

खेड (प्रतिनिधी) येथील शासकीय धान्य गोदामापैकी एक गोदाम जीर्ण होऊन कोसळल्याला दोन वर्षे उलटली असली, तरी अद्याप त्या जागेवर नवीन गोदाम उभे राहिले नसल्याने सरकारी लालफितीच्या कारभाराची कीव येत आहे. जीवनावश्यक वस्तू असलेले शासकीय धान्य साठवण्याचे ठिकाण तातडीने उभे राहण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होणे अपेक्षित असताना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनदेखील अद्याप नवीन गोदाम उभारणीला गती देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

खेड तालुक्यातील लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना वितरित करण्यासाठी सरकारकडून येणाऱ्या धान्याची साठवणूक करण्यासाठी शहरातील समर्थनगर येथे दोन धान्य गोदाम यापूर्वी होती. त्यापैकी एक गोदाम जीर्ण होऊन दोन वर्षांपूर्वी ते कोसळले. त्याचा उरलेला भाग मोठी दुर्घटना घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने पाडून टाकला. मात्र, दोन वर्षे उलटून देखील सा. बां. कडून ९१ लाख ६७ हजारा चे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे

 

खेडमध्ये दोन शासकीय धान्य गोदाम असून, त्या पैकी एक जीर्ण झाल्याने ते पाडून टाकण्यात आले. सन २०२२ मध्ये त्या ठिकाणी ९१ लाख ६७ हजार रुपये खर्चाचे नवीन इमारतीचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आले आहे. अंदाज पत्रक तयार केलेल्या गोदामांची क्षमता ५०० मेट्रिक टन असून, अद्याप त्याला शासकीय मंजुरी मिळालेली नाही.

 

गोदामाच्या पूनर्बांधणीसाठी वरिष्ठ पातळीवरून अद्याप कोणतीही दखलच घेण्यात आली नाही. ब्रिटिशांच्या राजवटीत शहरातील सैनिकी मुलांच्या वसतीगृहासमोर ४३६८ चौरस फूट क्षेत्रात जमिनीपासून एक ते दीड फूट उंचीवर दगडी चिरा, पत्रे व लाकडांच्या सहाय्याने बांधण्यात आलेल्या गोदामात १९२७ पासून धान्याचा साठा केला जात होता. या गोदामाची ५०० मेट्रिक टन धान्य साठवणूक क्षमता होती. या गोदामालगतच २२० चौरस फूट क्षेत्रात धान्याची नोंदी ठेवणारे छोटेखानी कार्यालय आहे. ९५
सन २०२३ मध्ये गोदाम दुरुस्तीसाठी ८ लाख मंजूर झाले होते. त्यामध्ये उर्वरित गोदामांची दुरुस्ती करण्यात आली

 

तत्कालीन अर्थमंत्री सुनील तटकरे, आमदार योगेश कदम यांनी देखील गोदामाच्या रूस्तीसाठी पाठपुरावा केला होता. २०१० मध्ये गोदामाच्या तातडीने दुरुस्तीसाठी २१ लाखांचा, २०१३ मध्ये २४ लाखांचा, तर २०१९मध्ये ५४ लाख ७५ हजार रुपयांची अंदाजपत्रकेही तयार करण्यात आली होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग चिपळूण येथील अभियंते यांनी गोदामाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर मोडकळीस आलेले गोदाम ८ फेब्रुवारी २०२२ रोजी जमीनदोस्त झाले. सद्यस्थितीत गोदामाची दर्शनी भिंतीचे दगडी चिरे अर्धवटस्थितीत उभे आहेत. गोदामाच्या पुनर्बांधणीसाठी आश्वासक हालचाली होताना दिसत नाही.