खून की अपघात? पेडणे पोलिसांसमोर आरोपी शोधण्याचे आव्हान
पेडणे (प्रतिनिधी) :
दाडाचीवाडी – धारगळ येथे रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एका टेम्पो रिक्षाने स्कूटरला मागून जोरदार धडक दिल्यामुळे देविदास ऊर्फ देऊ चंद्रकांत कोनाडकर (४९, दाडाचीवाडी, धारगळ) यांचा मृत्यू झाला. टॅक्सी व्यावसायिक असलेले देविदास कोनाडकर हे नागझर येथून आपल्या स्कूटरने (जी.ए ११ एफ ३३६८) घरी येत असता टेम्पो रिक्षाने मागून त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत स्कूटरसह ते रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. अपघातानंतर धडक देणारे वाहन पळून गेले. देविदास कोनाडकर यांना उपचारासाठी कासारवर्णे येथील सरकारी इस्पितळात नेत असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह गोमेकॉत पाठवला आहे. शवचिकित्सा अहवाल अजून मिळालेला नाही.
पेडणे पोलीस स्थानकाचे उप अधीक्षक जीवबा दळवी यांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली आहे. नागरिकांचे तसेच टॅक्सी व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, हा अपघात नसून खून झालेला आहे. यासाठी पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे, मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर हे तपास करत आहेत. सदर गाडीवर धडक दिल्याचे काहींचे म्हणणे असून त्याबाबतही चौकशी सुरू आहे. अपघातानंतर वाहन चालक वाहन घेऊन पळून गेल्यानंतर स्थानिक आणि वाहन चालकांनी नागझर येथे विमानतळाचा मुख्य रस्ता सुमारे तीन तास रोखून धरला. या दरम्यान पोलीस उशिरा आल्याचेही तक्रार या स्थानिकांनी केली आहे. पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांना माहिती मिळताच त्यांनी पेडणे पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्याशी चर्चा केली. तसेच याबाबत सखोल चौकशी करण्यासाठी आदेश दिले आहेत.
देविदास कोनाडकर यांचा खून की अपघात?
अपघातानंतर देविदास कोनाडकर यांना कासारवर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले होते. त्यानंतर लोकांनी पोलीस उशिरा आल्याच्या कारणास्तव रस्ता रोको केला आणि संशयित पळून गेल्याने शेकडो टॅक्सी वाहक चालक तसेच ग्रामस्थ जमा झाले. जोपर्यंत संशयतीला पेडणे पोलीस अटक करत नाही आणि त्याला शिक्षा करत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता अडवणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. सोमवारी जर अपघातातील संशयीताला पकडला नाही तर रस्ता अडवण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. याच दरम्यान सदर इसमाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह कासारवर्णे येथून पीर्ण मार्गे गोवा वैद्यकीय महाविद्यालयात कोणाला न कळता गुपचूप नेण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. जर हा घातपात नसेल तर हा मृतदेह लपून-छपून का नेला असा प्रश्न यावेळी स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला.
मृत इसमाचा कान अपघातास्थळी मिळाला
दरम्यान मृत इसमाचा एक कान कापुन टाकून अपघाता स्थळी सापडला. त्यामुळे हा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच त्यांचे सहकारी मित्र आणि ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासाठी पेडणे पोलिसांसमोर आरोपी शोधून काढण्याचं मोठं आव्हान असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुलगे असा परिवार आहे.
अपघातात कारणीभूत ठरलेल्या संशयित असलेले रिक्षा एक ब्राऊन कलर किंवा तांबड्या रंगाची रिक्षा यांनी धडक दिल्याची माहिती काही नागरिकांनी दिली. दोन्ही रिक्षांचे नंबर त्यासाठी मिळवण्यात आल्याची माहिती जीवबा दळवी त्यांनी दिलेली आहे. पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे तसेच मोपा पोलीस निरीक्षक नारायण चिमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.












