फुरूस-गावठणच्या ग्रामस्थांना पाणीटंचाईचे सर्वाधिक चटके, १२ वाड्यांतील ग्रामस्थ पाण्यासाठी व्याकूळ
खेड(प्रतिनिधी) तालुक्यात पाणीटंचाईने रौद्ररूप धारण केल्याने आतापासूनच ग्रामस्थांसह प्रशासन रडकुंडीस आले आहे. तालुक्यात ३२ गावे ३५ वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोहचत असून तब्बल ३९२० ग्रामस्थ तहानलेले आहेत सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके फुरूस- गावठण वाडीतील ग्रामस्थांना बसत आहे तर सर्वाधिक कमी पाणीटंचाईची झळ तळे-धनगरवाडी व घेरासाळगडातील ओझरवाडी येथील ग्रामस्थांना बसत आहे. या दोन्ही वाड्यांतील अवघ्या १० ग्रामस्थ तहानलेले आहेत
तालुक्यात ८ एप्रिलपासून पाण्याचा पहिला टँकर धावू लागला आहे. सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांमध्ये पाण्याचा पहिला टँकर धावू लागल्यानंतर एकामागोमाग एक टँकरच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दाखल हाऊ लागले. रणरणत्या उन्हामुळे पाण्याचे उपलब्ध जलस्रोत आटत आटत असल्याने दिवसागणिक टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तहानलेल्या गाव-वाड्यांचे अर्ज प्राप्त होताच प्रशासनाकडून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्याची कार्यवाही केली जात असल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळत आहे.
तालुक्यात सर्वाधिक पाणीटंचाईची झळ फुरूस येथील १२ वाड्यांना सर्वाधिक पाणीटंचाईची झळ बसत असून तब्बल २३१९ ग्रामस्थ तहानलेले आहेत याच गावातील गावठण वाडीला सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके बसत असून ५०४ ग्रामस्थ पाण्यासाठी हंबरडा फोडत आहेत. या खालोखाल सुसेरी-देवसडे येथील ६ वाड्यांना पाणीटंचाईचे चटके बसत असून ४१३ ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रोश करत आहेत.
घेरारसाळगडातील ५ वाड्यांतील ग्रामस्थांचा हंबरडा सुरू असून याच गावातील ओझरवाडीतील अवघ्या १० ग्रामस्थांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.
या खालोखाल कशेडी येथील ३ वाड्यांतील २६५ ग्रामस्थांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. कुळवंडी-शिंदेवाडी येथील ३०० ग्रामस्थांनाही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. सवणस येथील दोन वाड्यांना अजूनही टँकरची प्रतीक्षाच आहे. रखरखत्या उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे जलस्रोत तळ गाठत असल्याने टंचाईग्रस्त गाव-वाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, तरीदेखील प्रशासनाकडे अवघे दोनच टँकर उपलब्ध असून दिवसाला टँकरच्या ८० फेऱ्या धावत आहेत. अपुऱ्या टँकरमुळे तहानलेल्या गाव-वाड्यांना पाणीपुरवठा करताना प्रशासनाची दमछाकच होत आहे.










