हरकुळ बुद्रुक येथील नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केली पहाणी

आमदार नितेश राणे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची केली होती मागणी

कणकवली : वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा हरकुळ बुद्रुक गावातील शेखवाडी व खडकवाडीला मोठा फटका बसला. पाऊस व जोरदार वादळामुळे भागातील अनेकांच्या घराचे छप्पर,पत्रे, कौले उडून गेली आहेत. तर विद्युत तारा व पोल कोसळुन मोठे नुकसान झाले. आमदार नितेश राणे यांनी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणांना नुकसानग्रस्त भागांत जाऊन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी शुक्रवारी सायंकाळी हरकुळ बुद्रुक येथे नुकसानग्रस्त झालेल्या शेखवाडी व खडकवाडी येथील नुकसान झालेल्या घरांची पहाणी केली.

 

यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

 

किशोर तावडे यांनी नुकसानग्रस्तांची चर्चा केली. विदुयुत पुरवठा खंडित झाल्यामुळे शेखवाडी व खडकवाडीला होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शुक्रवारी सकाळापासून महावितरणकडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु होते.