माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
जुनाट वृक्ष पावसाळ्यापूर्वी तोडण्याचीही मागणी
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी शहरांत अतिवृष्टी मुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी तुंबून पादचारी व वाहन चालक यांना प्रवास करणे नामुष्की होते. सदर ठिकाणे ही नगरपरिषद प्रशासनाला माहिती असून बांधकाम खात्याने याबाबत त्वरित डागडुजी विषयक आवश्यक ती सर्व कामे अग्रक्रमाने करणे गरजेचं आहे, अशी मागणी सावंतवाडी नगर परिषदेचे माजी सभापती ॲड. परिमल नाईक यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.
तसेच शहरात बऱ्याच ठिकाणी धोकादायक जुनाट वृक्ष कधीही पडून जीवित हानी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रसंगी विद्युत वाहिनीवर वृक्ष पडल्यास विजेची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात भेडसावणार असल्याने ती पावसापूर्वी तातडीने तोडणे गरजेचं असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे.
सावंतवाडी शहरात अद्याप पर्यंत गटार सफाई व नाले सफाई कामे हाती घेतलेली नाही. पावसाळा अगदी नजीक येऊन ठेपलेला असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी व नागरिकांना नाहक त्रास होऊ नये याकरिता वरील सर्व कामे तातडीने करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.












