खेड तालुक्यात अवकाळी पावसामुळे महावितरणचे ३० लाखांचे नुकसान !

 

वीज पुरवठा पूर्ववत करण्यावर भर !

खेड शहरासह तालुक्यतील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने गुरुवारी दणका दिल्यानंतर तालुक्यासह ग्रामीण भागातील अनेक वृक्ष उन्मळून पडल्याने महावितरण विभागाचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक घरांचे नुकसान झाल्याने प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

खेड शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागाला अवकाळी पावसाने झोडपल्यामुले अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला . तर तालुक्यातील फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने खेड शहराला आणि परिसरातील गावांना मोठा दणका दिला आहे. अवकाळी पावसाचा सर्वात मोठा दणका हा खेड शहराला बसला असून बहुतांश ठिकाणी झाडे कोसळल्याने महावितरणचे १५० वीजखांब तर मोठ्या लाईनचे १७ वीजखांब उध्वस्त झाले आहेत. यापैकी १५० पैकी ५० वीजखांब तर मोठ्या लाईनचे १० वीजखांब उभे करण्यात महावितरण कर्मचारी यांना यश आले आहे.

अवकाळी पावसाने नातूनगर, शिवतर, फुरुस, नांदगाव, खारी, मुंबके, आंबवली या भागातील महावितरणचे नुकसान झाले आहे. तसेच शहरातील बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टॉवरला देण्यात आलेले २०० केव्ही जोडणीचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. शहरातील वीजपुरवठा जवळ जवळ सुरळीत झाला असून अजून ५०० ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर देण्यात येत असून एकंदरीत या अवकाळी पावसामुळे महावितरण विभागाचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे.

महावितरणचे ८ अधिकारी, कर्मचारी तसेच खाजगी ठेकेदार यांचे सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला जात असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतारे यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे घरांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि तलाठी यांना तातडीचे आदेश देण्यात आले असून खेड शहर, चाकाळे, भोस्ते, शिवतर, सुकीवली आदी ठिकाणी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाके असल्याने त्यांचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार सुधीर सोनवणे यांनी दिले आहेत. तर फळझाडे, फळबाग यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी १६ कृषी सहाय्यक आणि ५ कृषी अधिकारी यांना आदेश दिले असल्याचे तालुका कृषी अधिकारी रवि माळी यांनी सांगितले.