खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीला अवकाळी पाऊस व वादळीवाराचा जोरदार फटका बसला. औद्योगिक वसाहतीमध्ये श्रेय सेंटरमिजिएट या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची चिमणी कोसळून सुमारे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.
१६ रोजी दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास अचानक चालू झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांना फटका बसला. अनेक छोट्या मोठ्या कारखान्यांचे पत्रे उडाले. श्रेयस इंटरमिजिएट लिमिटेड, प्लॉट नंबर डी- २१/ २२/ २३ /२४ लोटे-परशुराम या रासायनिक कारखान्याची ३२ मीटर उंचीची थर्मिक फ्लुईड चिमणी कारखान्याच्या आवारातील इतर तीन इमारतींवर कोसळली. तरीही सुदैवाने कोणत्याही प्रकारची मनुष्यहानी व कामगार जखमी झाले नाहीत.मात्र या तीन इमारतींचे आणि चिमणीचे असे मिळून सुमारे एक कोटींचे नुकसान झाल्याचे कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री अनंत महाडिक यांनी सांगितले.
कारखान्यामधील आणखी काही इमारतींचे पत्रे उडून दूरवर फेकले गेले. परंतु सुदैवाने कोणी कामगार जखमी झाले नाहीत. वादळी वाऱ्याचा जोर एवढा प्रचंड होता की एवढी मजबूत बांधकाम असलेली थर्मिक फ्लूईडची चिमणी कोसळून पडली आणि तीन इमारतींचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.











