
पार्किंगची व्यवस्था अर्धवट, ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी
पेडणे l निवृत्ती शिरोडकर : मोरजी पंचायत क्षेत्रातील समुद्रकिनारी भागात रविवार सुट्टीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी गर्दी केली होती. किनाऱ्यावर जाण्यासाठी असलेले अरुंद रस्ते, पार्किंगची असुविधा यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. किनारी भागात पर्यटकांना सोयीसुविधा पुरविण्यात प्रशासन अयशस्वी झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
मे महिना सुरू झाल्यानंतर किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती. परंतु किनारी भागात असलेली पार्किंग व्यवस्था अपुरी पडत आहे. चेंजिंग रूम, शौचालय या सुविधाही अपुऱ्या पडत असलेल्या दिसून आल्या. विशेषतः महिलांना याचा त्रास होत असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले.
मोरजी टेंबवाडा किनारी भागात कासव संवर्धन मोहीम यशस्वीपणे राबवली जाते. त्याही अनुषंगाने काही पर्यटक अभ्यास करण्यासाठी या कासव संवर्धन मोहिमेला भेटी देतात. त्यामुळे किनाऱ्यावर गर्दी होत असल्याचे चित्र दिसते. उन्हाळी सुट्टीत स्थानिक पर्यटक आपल्या कुटुंबियां सहित या भागात दरवर्षी येतात. अरुंद रस्ते व पार्किंग असुविधा यामुळे वाहतुक कोंडी होण्याचे प्रकार सर्रास घडतात. पर्यटन हंगाम ऑक्टोबर ते एप्रिल पर्यंत मोठ्या प्रमाणात सुरू असतो. मात्र, मे महिना सुरू झाल्यानंतर या किनारी भागात मोठ्या प्रमाणात देशी पर्यटकांचा भरणा आणि स्थानिक नागरिकांची रेलचल सुरू असल्याचे दिसून येते.
पर्यटन हंगामात होणाऱ्या गैरव्यवहारांवर अंकुश ठेवण्यात पोलीस प्रशासन अपयशी असल्याचे दिसून येते. पर्यटन हंगामात किनारी भागात ड्रग्स, ध्वनी प्रदूषण, चोऱ्या, विनयभंग असे वेगवेगळे प्रकार घडत असतात. या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी दरवर्षी पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी सरकार अशा व्यवसायावर अंकुश ठेवणार असल्याचे जाहीर करतात. परंतु एकदा पर्यटन हंगाम सुरू झाला की बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई होत नसल्याचे चित्र दिसून येते.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी सरकार दरबारी प्रयत्न करून मांद्रे मतदार संघासाठी खास पोलीस स्टेशनची निर्मिती केली. किनारी भागाचा विचार करता ध्वनी प्रदूषण, ड्रग्स, वेश्याव्यवसाय हे व्यवसाय खुलेआमपणे सुरू असून त्यावर अंकुश ठेवण्यास मांद्रे पोलिसांना यश का येत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
पहाटे चार पर्यंत किनारी भागातील हॉटेल्स का खुली ठेवली जातात? असा सवाल उपस्थित होत आहे.











