नागरिकांची त्रेधातिरपीट
बांदा l प्रवीण परब : बांदा शहराला सलग दुसऱ्या दिवशी पूर्व मोसमी पावसाने झोडपून काढले. विजेच्या गडगडाटासह दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाची इंट्री झाली. सोमवार आठवडा बाजार असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांसह ग्राहकांचीही त्रेधातिरपीट उडताना दिसून आली. मासळी मार्केट रोडवरील गटारे तुंबलेली असल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्याचा त्रास किरकोळ व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही झाला.
बांदा आळवाडा येथील शेर्ले – बांदा पूलाच्या जोडरस्त्यावर चिखलमय स्थिती झाली होती. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार घडलेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात दिरंगाई केल्याने स्थानिकांमधून संताप व्यक्त करण्यात आला.
बांदा शहरासह मडूरा, सातार्डे, विलवडे दशक्रोशीतही पूर्व मोसमी पावसाने जोरदार बॅटिंग केली. मान्सूनपूर्व कामे उरकण्याच्या लगबगीत असलेल्या शेतकरी वर्गाला याचा फटका बसला. गुरांसाठीचे सुके गवत गोळा करणे, सरपणाची लाकडे जमा करणे, घरे शाकारणीची कामे पावसामुळे खोळंबली.










