Gatha of Shri Laxmipallinatha published in E-Book format in Marathi and English
मठ : श्री लक्ष्मीपल्लीनाथ या देवतेचा इतिहास आणि अन्य महत्त्वपूर्ण संदर्भांची माहिती देणारी ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही पुस्तिका ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आली आहे. संदीप नाटेकर यांनी केलेल्या त्या पुस्तिकेच्या इंग्रजी अनुवादाचेही ई-बुक प्रकाशित करण्यात आले आहे. मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानात सध्या चैत्रोत्सव सुरू आहे. त्या उत्सवात दोन एप्रिल २०२३ला रात्री या ई-बुकचे प्रकाशन झाले. ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ. प. मकरंदबुवा सुमंत (रामदासी), यंदाच्या उत्सवाचे यजमान डॉ. भास्कर प्राणी (मिरज), संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर, उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये आणि अनिकेत कोनकर (कोकण मीडिया) यांच्या हस्ते ही ई-बुक्स प्रकाशित करण्यात आली. या वेळी संस्थानचे पदाधिकारी, तसेच श्री लक्ष्मीपल्लीनाथाचे कुलोपासक आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री लक्ष्मीपल्लीनाथाच्या मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील संस्थानाची मुहूर्तमेढ २०१२ साली रोवली गेली. त्या मंदिराचे कलशारोहण २०१८ साली झाले, तेव्हा शंकराचार्यांच्या हस्ते ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही स्मरणिका छापील स्वरूपात प्रकाशित करण्यात आली होती. लक्ष्मीपल्लीनाथ या देवतेचा नेमका इतिहास काय, पाली येथे मंदिर असताना मठ येथे नवे मंदिर का उभारावे लागले, त्यामागची नेमकी भूमिका काय, अक्षरशः शून्यातून उभ्या झालेल्या मंदिराच्या स्थापनेच्या प्रवासाचे टप्पे कोणते या गोष्टींची माहिती सर्व कुलोपासकांना व्हावी आणि संदर्भासाठी ती कायम उपलब्ध असावी असा ती स्मरणिका प्रसिद्ध करण्यामागचा उद्देश होता. त्या स्मरणिकेत मंदिराच्या वाटचालीच्या माहितीबरोबरच विविध फोटोग्राफ्स, स्तोत्रे, ध्यानमंत्र, श्लोक, आरत्या आदी साहित्याचाही समावेश करण्यात आला. यशवंत आठल्ये आणि उमेश आंबर्डेकर यांनी त्या स्मरणिकेसाठी माहिती संकलित केली होती.
त्या स्मरणिकेला चांगला प्रतिसाद लाभला. पुण्यातील संदीप उदय नाटेकर यांना आपल्या कुलदेवतेची माहिती नव्हती. काही कारणाने ते रत्नागिरीला आले असताना पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात जाणे झाले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी ते फेब्रुवारी २०२२मध्ये मठच्या या नव्या मंदिरात आले. तिथे ‘गाथा श्री लक्ष्मीपल्लीनाथाची’ ही स्मरणिका त्यांच्या हातात पडली. नवे मंदिर पाहून तर ते प्रभावित झालेच; पण स्मरणिका वाचल्यानंतर त्यांना लक्ष्मीपल्लीनाथ या आपल्या कुलस्वामीचा इतिहास कळला. त्यामुळे त्यांना अधिक आनंद झाला. हा इतिहास केवळ शहरातच नव्हे, तर जगभरात पसरलेल्या कुलोपासकांच्या नव्या पिढीला सहज उपलब्ध व्हावा आणि त्या पिढीचा इंग्रजी भाषेशी संबंध अधिक असल्याने त्यांना तो इंग्रजी भाषेत उपलब्ध व्हावा, या हेतूने संदीप नाटेकर यांना ती स्मरणिका इंग्रजीत अनुवादित करण्याची कल्पना सुचली. ते उच्चशिक्षित असून, फ्रीलान्स प्रोफेशनल ट्रान्स्लेटर म्हणून कार्यरत आहेत.
कुलदेवतेची सेवा म्हणून हे करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केल्यानंतर संस्थानाने त्यांच्या कल्पनेचे स्वागत केले आणि त्यांनी त्या स्मरणिकेचा इंग्रजी अनुवाद केला. तो इंग्रजी अनुवाद ई-बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला. तसेच, मूळ मराठी स्मरणिकेचेही ई-बुक प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे संदर्भमूल्य असलेल्या माहितीचा हा ठेवा जगभर पोहोचण्यास मदत होणार आहे. स्मरणिका छापील स्वरूपात प्रकाशित केलेल्या कोकण मीडियाच्या सत्त्वश्री प्रकाशनानेच ही दोन्ही ई-बुक्स प्रकाशित केली आहेत. ही ई-बुक्स गुगलवर उपलब्ध झाली असल्याने मोबाइल, लॅपटॉप, टॅब, कम्प्युटर अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर वाचता येणार आहे. मराठी स्मरणिकेचे ई-बुक ५० रुपये असून, इंग्रजी ई-बुक मोफत उपलब्ध करण्यात आलं आहे. खाली दिलेल्या लिंक्सवरून किंवा क्यूआर कोड स्कॅन करून ती ई-बुक्स डाउनलोड करून घेता येतील. मराठी स्मरणिका छापील स्वरूपात हवी असल्यास संस्थानचे अध्यक्ष सुधाकर चांदोरकर (9422646765) किंवा उपाध्यक्ष शशिकांत गुण्ये (7875993699) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठी ई-बुकसाठी लिंक : http://bit.ly/Laxmi-PallinathGaathaMarathi
इंग्रजी ई-बुकसाठी लिंक : http://bit.ly/Laxmi-PallinathGaathaEnglish