गीतेमुळे जीवनातील पुष्कळशा समस्या सोडवण्यास मनोबल प्राप्त होईल : राजेन्द्रप्रसाद मसुरकर

रत्नागिरी : भगवद्गीता हे चार व्यक्तींच्या संवादांतून निर्माण झालेले सर्वांगसुंदर काव्य आहे. गीतेचा अर्थ आजच्या काळात जाणून घ्यावा व यानंतर दररोज तोंडपाठ म्हणावा. इतके केले तरी आपल्या वैयक्तिक व सार्वजनिक जीवनातील पुष्कळशा समस्या सोडवण्यास मनोबल प्राप्त होईल, असे असे प्रतिपादन चरित्रकार, अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर म्हणाले.

सद्गुरू डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवारातर्फे विठ्ठल मंदिरात आजचा काळ आणि भगवद्गीता या विषयावर आयोजित प्रवचनात श्री. मसुरकर बोलत होते. ते म्हणाले की, भगवद्गीता हा भारतासह विदेशातील पंडितांच्या कुतूहलाचा व व्यासंगाचा महत्त्वाचा विषय आहे. त्यांनी या ग्रंथाचा लोकशिक्षण व जनजागृतीसाठी उपयोग केला. गीतेचा अभ्यास करून अनेकांनी मीमांसा, भाष्य, टिप्पणी केली आहे. संत ज्ञानेश्वर, लोकमान्य टिळक यांनी सुरेख लिहिले आहे. महाभारतामध्ये आप्तेष्टांना मारावे लागणार या कल्पनेने अस्वस्थ झाल्याने शस्त्रत्याग करून रणांगणावर बसकण मारणाऱ्या अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करण्यासाठी त्याच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या श्रीकृष्णाने केलेला उपदेश म्हणजे गीतेचे सार. आज विद्यार्थी, पालक, शेतकरी, नोकरदार, संसारी माणसे अर्जुनासारखी मनस्थिती अनुभवत आहेत. गीता त्यांचे प्रबोधन करू शकेल. याकरिता गीतापठण करावे, गीता जाणून घ्यावी.

ते म्हणाले की, जीवनशैली बदलली आहे. जीवनसंघर्ष अटळ बनला आहे. विचारांची जागा विकाराने घेतली आहे. या सर्व परिस्थितीतून सकारात्मक पावले टाकायची असतील तर भगवद्गीता हे त्यासाठी बळ देणारे साधन आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता आजही तितकीच उपयुक्त व परिणामकारक आहे. गीता हा धर्मग्रंथ फार जड नाही, कोणीही वाचू शकतो. त्याचा अर्थ काढून आपण जगलो तर जीवन निश्चितच सुखकारक होईल, असे प्रतिपादन चरित्रकार, अभ्यासक राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी केले.

गीतेच्या वैशिष्ट्यांची ओळख करून घेऊन तिचे आचरण करण्यात भारतीय लोक कमी पडत असल्याची खंत श्री. मसुरकर यांनी व्यक्त केली. गीतेचे पठण व अध्ययन करण्याकडे वळणाऱ्यांची संख्या कमी आहे. सर्वांत वाईट गोष्ट अशी की गीता वगैरे संस्कृत व प्राचीन ग्रंथ हे आपले नव्हेत असे मानण्याची प्रवृत्ती वाढत आहे. जी गीता ऐकून हताश अर्जुन युद्धास प्रवृत्त झाला, तीच गीती ऐकून आपण उत्साही बनत नाही, असेही श्री. मसुरकर यांनी सांगितले. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक स्वप्नाली जोशी, सद्गुरू स्तवन प्रांजली विलणकर, प्रार्थना सौ. गीता रुणकर आणि गवळण अनुया बाम यांनी सादर केली. याप्रसंगी श्री. मसुरकर यांचा सन्मान करण्यात आला.