लांजा :
लांजा शहरानजीकच्या धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ७ सप्टेंबर) रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश हरिश्चंद्र पांचाळ (वय ३५, रा. धुंदरे सुतारवाडी) हा रविवारी रात्री साडेदहा वाजता शेजारी राहणारे बाळकृष्ण करंबळे यांच्या घरी गणपती विसर्जनानिमित्त आयोजित जेवणाच्या कार्यक्रमाला गेला होता. जेवण करून तो घरी परतला. त्यानंतर पुन्हा घराबाहेर पडला. त्याची पत्नी वैशाली हिने “कोठे जातोस?” असा प्रश्न विचारला असता, “जरा बाहेर जाऊन येतो,” असे सांगून तो निघून गेला.
बराच वेळ झाला तरी अविनाश घरी न परतल्याने कुटुंबीय आणि वाड्यातील लोकांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला त्याने गळफास लावलेला अवस्थेत तो आढळला.
ग्रामस्थांनी त्याला तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक अशोक कंठपगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे अधिक तपास करीत आहेत.












