सावर्डे वहाळफाटा येथील दुकान गाळ्यांवर झाड कोसळले; इमारतींवरील पत्रे उडाले; घरांवर झाडे कोसळून घरांचे नुकसान
चिपळूण (प्रतिनिधी) :– गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून बुधवारी पुन्हा एकदा सावर्डे परिसराला जोरदार दणका दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस दररोज सायंकाळी हजेरी लावत आहे. विजांचा कडकडाटसह हा पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत होत आहे. गेल्या काही दिवसांतील अवकाळी पावसामुळे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणला देखील दणका बसत असल्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत.
तर बुधवारी दुपारपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने यामध्ये सावर्डे परिसराला जोरदार दणका बसला आहे.

सावर्डे वहाळफाटा येथे दुकान गा दुकान गाळ्यांवर झाड पडले असून पाच दुकानदारांचे नुकसान झाले आहे. तसेच मुंबई गोवा महामार्गाचे काम चालू आहे. जो ठेकेदार हे काम करत आहे. त्याच्या ढिसाळ कामामुळे संपूर्ण सर्व्हिस रोडवर चिखलाचे साम्राज्य तसेच पाणी भरले आहे.
सावर्डे कुडपफाटा येथील सिद्धेश्वर अपार्टमेंटच्या शेडवरील पत्रे उडून बाजूला असणाऱ्या दुर्गवाडी रोडवर पडले. तसेच बाजूला असणाऱ्या साईव्हीला अपार्टमेंटवर देखील पडले. यामुळे सावर्डे परिसरात नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
डेरवण फाट्यावरील महावितरणची इलेव्हन केवीची पोल वादळाने कोसळल्याने सावर्डे पंचक्रोशीतील वीज पुरवठा खंडित झाला आहे. यामुळे या परिसरातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
डेरवण काजरकोंड गावात ठिकठिकाणी घरांवर झाडे पडली आहेत. तर उभ्या असलेल्या गाड्यांवर झाडे कोसळल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज खांब उन्मळून पडले आहेत. तर काही दुकानांचे पत्रा शेड उडाली आहे. एकंदरीत सावर्डे पंचक्रोशीला जबर तडाखा बसला आहे.











