सामाजिक कार्यकर्त्यांचा संतप्त सवाल
पेडणे (प्रतिनिधी ) :
राष्ट्रीय महामार्ग ६६ नईबाग येथील जंक्शन हे सरकारने पेडणेकरांचे मृतदेह मोजण्यासाठी तयार केले आहे का ? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. सरकारने हे जंक्शन तातडीने रद्द करावे व अन्य दुसऱ्या ठिकाणी करावे अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी आणि स्थानिकांनी तसेच विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. नईबाग जंक्शनवर शुक्रवारी झालेल्या अपघातात तोरसे येथीस सविता नाईक या महिलेचा जागीच मृत्यू झाल्यानंतर नईबाग जंक्शनवर पञकार परिषद आयोजित करुन संतप्त प्रतिक्रिया दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी यांनी अपघाताबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. अनेक वेळा या ठिकाणी अपघात होऊनही आतापर्यंत सरकारला जाग आली नाही. याच ठिकाणी हल्लीच अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. मात्र सरकार आणि एमव्हीआर रस्ता विभाग कंपनी यांना कुणाची पर्वा नाही. हे सरकार आणि एमव्हीआर कंपनी लोकांचे मृतदेह मोजण्याचे काम करते का असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते शंकर पैळजी यांनी पञकार परिषदेत केला.
यावेळी अॕड. जितेंद्र गावकर, सामाजिक कार्यकर्ते अॕड प्रसाद शहापूरकर, भास्कर नारुलकर, इजिदोर राॕड्रिग्स, अभिषेक नाईक, जुवांव फर्नाडिस, साहिल तेली, काॕस्ता फर्नाडिस आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते शंकर पोजी म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग ६६ वर नईबाग येथील जंक्शन मृत्यूचा सापळा बनले आहे. या ठिकाणी अनेक अपघात होऊन सरकार डोळेझाक करत आहे . या ठिकाणी सर्व्हिस रस्ते नाहीत. सरकार मात्र या गोष्टीवर डोळ्यावर पट्टी बांधून आहे. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी, आपणही याबाबत आवाज उठवला. आपण दोष कुठल्याही राजकीय व्यक्तीला देत नाही. मात्र सरकारचे जे अधिकारी आहेत आणि सरकारची यंत्रण आहे त्यांना आपण दोष देतो. त्यानी या ठिकाणी लक्ष देणे गरजेचे होते. हा रस्ता धोकादायक स्थितीत असल्याची माहिती असूनही या ठिकाणी उड्डाणपूल तथा अंडरप्रास सोय करण्यात आली नाही.
शंभर कोटी वाचवण्यासाठी आणि ते कुणाच्या खिशात घालण्यासाठी सरकारने या ठिकाणी हा मृत्यूचा सापळा बनवला आहे. या मृत्यूच्या सापळ्यात आज पेडणेकरांचे नाहक बळी जात आहेत. मालपेहून भरवेगाने येणारी अवजड वाहने आणि याठिकाणी उतार असल्याने या गाड्यावरचा ताबा वाहनचालकांचा जातो आणि हे आपघात होतात. सरकारने तातडीने या ठिकाणी हे जंक्शन त्वरित बंद करावे आणि दुसऱ्या ठिकाणी जंक्शन करावे. अशी मागणी यावेळी सामाजिक कार्यकर्ते शंकर पोळजी या़ंनी केली.
इजिदोर राॕड्रिग्स म्हणाले की, आतापर्यत अनेक अपघात झाले. वेळोवेळी अपघाताबाबत वर्तमानपत्रातून आणि सामाजिक माध्यमातून आवाज उठवला जातो. मात्र आमच्या आवाजाकडे सरकार पहात नाही. अनेक वेळा या ठिकाणी अपघात झाले आणि आतापर्यंत या अपघात दोघा जणाचे बळी गेले आहेत. अनेकजण जायबंदी झाले आहेत. मात्र या ठिकाणी कुणालाही त्याची पर्वा नाही. आमदार प्रवीण आर्लेकर यांनी याबाबत वेळोवेळी आवाज उठवला आणि या जंक्शनाबाबत अधिकाऱ्यांना सांगितले. मात्र त्याकडेही दुर्लक्ष सरकारी यंत्रणेने केले. तोरसे येथील महिलेचा नाहक बळी गेला. त्यासाठी आम्ही परत एकदा सरकारकडे मागणी करत आहोत की या ठिकाणी जे जंक्शन आहे ते त्वरित बंद करावे . या ठिकाणी उड्डाणपूल व्हावे तसेच अंडरप्रास व्हावा यासाठी आम्ही वेळोवेळी मागणी केली होती. मात्र आमच्या मागणीकडे सरकारने आणि एम.व्ही.आर कंपनीने दुर्लक्ष केल्याने आज ही स्थिती उद्भवली आहे. भविष्यात असेच या ठिकाणी अपघात होणार त्यासाठी हे जंक्शन त्वरित बंद करावे अशी मागणी यावेळी इजिदोर राॕड्रिग्स यांनी केली.
अॕड. जितेंद्र गावकर म्हणाले, रस्ता बांधकाम कंपनीने रस्ता बनवताना कुठल्याही प्रकारे स्थानिकांना किंवा स्थानिक पंचायतींना विश्वासात घेतले नाही . आम्ही याबाबत वेळोवेळी आवाज केला मात्र त्यांनी त्याची परवा केली नाही, आज या ठिकाणी अपघातात आमचे भगिनीचे बळी गेलि आहे . अनेक वाहनांना या ठिकाणी अपघात होत आहेत. अपघात क्षेत्र म्हणून हे जंक्शन प्रसिद्ध आहे . असे असताना या ठिकाणी सरकार कुठलीही खबरदारी घेत नाही . हे जंक्शन बंद करावे
अशी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे .या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जंक्शन ठेवून तसेच सर्विस रस्त्याची सोय देऊन लोकांचे होणारे बळी वाचवावे. हे जंक्शन रद्द करण्यासाठी आता नागरिकांनी एकसंघ होऊन बाहेर यावे लागणार असे सांगून हे जंक्शन रद्द करावे अशी मागणी यावेळी जितेंद्र गावकर यांनी केली .
अॕड. प्रसाद शहापूर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्ग बांधाकाम करणाऱ्या कंपनीवर अपघात होतात म्हणून आम्ही यापूर्वी तक्रार दिली होती.त्यांच्यावर एफआयआर नोंदणी सुद्धा झाली आहे. माञ अनेक अपघात होऊनही सरकारी यंञणा जागी झाली झाली नाही शुक्रवारी याठिकाणी अपघात होऊन या अपघात सुनिता नाईक हिचा बळी गेला . याला सरकार जबाबदार असून सरकार आणि रस्ता विभागाच्या निष्काळजीपणामुळेच हे घडत आहे.आता नागरिकांना याबाबत तीव्र आंदोलन छेडावे लागणार आहे असा इशारा दिला.
उदय महाले म्हणाले, सरकार असंवेदनशील असून महाखाजन ते पञादेवी पर्यंत अनेक अपघात झाले. या अपघातात अनेककांचे आतापर्यंत बळी गेले. रस्त्याचे योग्य नियोजन नसल्यामुळे हे अपघात होतात. अनेक ठिकाणी नियोजन अभावीमुळे हे अपघात घडतात.याला सर्वस्वी सरकार जबाबदार असून या जंक्शनसाठी प्रसंगी आंदोलन करावे लागले तरी करुया असे सांगितले.







