सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता म्हणून विशारद गुरव याला पुरस्कार

नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर

माखजन |वार्ताहर : अखिल भारतीय नाट्य परिषदेचे व्यवसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये प्रायोगिक संगीत नाटक पुरस्कारात सर्वोत्कृष्ठ संगीत नाटक म्हणून गुहागर तालुक्यातील परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे मुंबई प्रस्तुत जय जय गौरी शंकर या नाटकाला पुरस्कार जाहीर झाला आहे.
या नाटकात गायक अभिनेता म्हणून मुख्य भूमिका वठवणाऱ्या विशारद विनायक गुरव याला प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ठ गायक अभिनेता म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे.हा पुरस्कार १४ जून रोजी मुंबई माहीम येथे यशवंतरावं चव्हाण नाट्य संकुलात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.ही माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी प्रसार माध्यमाना दिली.
विशारद गुरव ह्यांनी संगीतातील प्राथमिक शिक्षण हे महेशकुमार देशपांडे यांचे कडे तर सध्या ते रत्नागिरी च्या प्रसाद गुळवणी यांचे कडे जयपूर घराण्याचे शिक्षण घेत आहेत.तर विलास हर्षे यांचेकडे नाट्य संगीताचे शिक्षण घेत आहेत.राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना आजवर तीन वेळा गायक नट म्हणून रौप्य पदक मिळाले आहे.मुंबई विद्यापीठात क्लासिकल गायनासाठी दोन वेळा रौप्य पदक मिळाले आहे..राज्यस्तरीय पं.राम मराठे जोडराग गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विशारद गुरव यांनी संगीत विशारद् ही पदवी प्राप्त केली आहे.तर आजवर संगीत कट्यार काळजात घुसली,संगीत संशयकल्लोळ,संगीत सुवर्णतूला,संगीत मंदारमाला,संगीत जय जय गौरी शंकर आदी नाटकात गायक नट म्हणून काम केले आहे.
विशारद गुरव हे संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल मध्ये संगीत व विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.संस्थेने शालेय मुलांसाठी गत वर्षात जिल्हा स्तरीय संगीत स्पर्धा घेतली होती.त्यात विशारद गुरव यांचे मोलाचे योगदान लाभले होते.
राज्य स्तरावर मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल विशारद गुरव यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.