चिपळूण नगर परिषदेतर्फे आपत्ती व्यवस्थापनाची उद्या बैठक

चिपळूण (प्रतिनिधी): काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे नगर परिषदेने मान्सून पूर्व तयारी व नियोजन करण्यावर अधिक भर दिला आहे. यातूनच ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे यावेळी व्यापाऱ्यांच्या सूचना ऐकून आपत्तीत नेमकी कोणती दक्षता घ्यावी याबाबत मुख्याधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

शहरात दरवर्षी पूराचे पाणी घुसत असून काहीवेळा महापूर येतो. त्यामुळे होणारे नुकसान याचा विचार करून आपत्ती आल्यास कमीत-कमी नुकसान होण्यासाठी काय करावे लागेल याची तयारी गेल्या काही दिवसांपासून नगर परिषद प्रशासन, करीत आहे. मान्सूनच्या अनुषंगाने बाजारपेठ परिसरात करावयाची कामे व अतिवृष्टीमुळे पूर, वादळ अशी आपत्तीजनक परिस्थिती उदभवल्यास व्यवस्थापनेच्या दृष्टीने नगर परिषदेने आवश्यक ती यंत्रसामुग्री तैनात केली आहे.

त्यात यांत्रिकी बोटी, साध्या बोटी, लाईफ जॅकेट, दोरखंड, बोये, जेसीबी, पोकलेन, डंपर, लागणारे मनुष्यबळ, सायरन आदींचा समावेश आहे. तसेच शहरातील धोकादायक झाडे, फांद्या तोडण्यासह नाले सफाई, धोकादायक इमारतींना नोटीस देण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन आराखडा व्यापाऱ्यांना समजावा यासाठी बैठक आयोजित करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे.