कोकण पदवीधरसाठी राष्ट्रवादीकडून दिशा दाभोळकर यांच्या उमेदवारीची मागणी

 

चिपळूण (वार्ताहर) : कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या दिशाताई दाभोळकर यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील युवक, युवतींनी केली आहे.

दिशाताई दाभोळकर या सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून आघाडीवर आहेत. पदवीधरांच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. त्यांचे सामाजिक व महिलांसाठीचे सुरू असलेले काम याची पक्षानेदेखिल वारंवार दाखल घेतली आहे. राष्ट्रवादी महिला प्रदेश सरचिटणीसपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. पक्षाच्या विविध उपक्रमात त्या कायमच आघाडीवर असतात. कोकण पदवीधर मतदार संघातून त्यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीच्या एक सक्षम अभ्यासू महिला आमदार म्हणून त्या सभागृहात जातील आणि पदवीधरांचे प्रश्न त्या मार्गी लावतील, अशी अपेक्षा युवक – युवतींमधून केली जात आहे. दिशाताई दाभोळकर या उच्चशिक्षित आहेत. त्या स्वतः इंजिनियर आहेत. शिक्षक म्हणून त्यांनी यापूर्वी काम केले आहे. पक्षाच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. युवती जिल्हा अध्यक्षा म्हणूनही काम करताना जिल्ह्यात त्यांनी लक्ष्यवेधी काम केले आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांचे पती दशरथशेठ दाभोळकर हेही राजकारण, समाजकारण, क्रीडा अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने कोकण पदवीधर मतदार संघातून त्यांना संधी देऊन महिला पदवीधर युवक यांच्यासाठीचे असणारे काम अधिक मजबूत करावे, त्यासठी दिशाताई दाभोळकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.