Prabodhan Yatra by Abhaannis in the district from 14th April
रत्नागिरी | प्रतिनिधी : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती(अभाअंनिस) तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्रबोधन यात्रा 14 एप्रिल पासून प्रबोधन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. अभाअंनिसचे कार्यकर्ते गावोगावी जाऊन महाराष्ट्र शासनाचा जादूटोणाविरोधी कायदा सहप्रयोग समजावून सांगणार आहेत.
अंधश्रद्धांचे निर्मूलन व्हायला पाहिजे, याविषयी कोणाचेच दुमत होणार नाही. भारतात अंधश्रद्धा निर्मूलनाची परंपरा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातही या कार्याला संपन्न परंपरा लाभलेली आहे. मध्ययुगीन महाराष्ट्रातील पहिले महत्वाचे प्रबोधन म्हणून संतांच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्याकडे आपल्याला बघावे लागते. बाराव्या-तेराव्या शतकात मराठी संतांनी केलेली धर्मचिकित्सा व अंधश्रद्धाविरोधी केलेली जागृती हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा महाराष्ट्रातील पहिला प्रयत्न होता, असे आपण ठामपणे म्हणू शकतो. अज्ञानी, अगतिक समाजाला ज्ञानाकडे घेऊन जाणे ही अंधश्रद्धा निर्मूलनाची पहिली पायरी असते.
आपल्या परिसरात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर सप्रयोग व्याख्यान देण्यात येईल. यासोबतच कायद्या संदर्भातील पोस्टर प्रदर्शन, पुस्तक विक्री, सभासद नोंदणी आणि एक दिवसाच्या शिबिराचे आयोजन करण्यात येईल. आपल्या वाडी-खेड्या गावात वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर सप्रयोग व्याख्यानाचे आयोजन करावे. या कार्यक्रमासाठी ॲड. योगेश पवार, शांताराम भूरवणे, मिलिंद कडवईकर, सदुप्पा कांबळे ,सचिन तांबे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती वतीने करण्यात आले आहे.