नारायण राणे यांचा प्रचंड मताधिक्याने विजय
महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
हा विजय मतदारांना समर्पित – नारायण राणे
रत्नागिरी (प्रतिनिधी) देशासह महाराष्ट्र आणि संपूर्ण कोकणचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीचे उमेदवार केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोकणात ‘दादाचं’ हे सिद्ध झाले आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील जनतेने या मतदारसंघात १० वर्षांनी परिवर्तन घडवत विकासाला साथ देण्याचा निर्णय घेत नारायण राणे यांना विजयी केले आहे. मंगळवारी अन्न महामंडळाच्या वखारीमध्ये झालेल्या मतमोजणीत प्रारंभीपासूनच अखेरच्या फेरीपर्यंत आघाडी घेत राणे यांनी निकटचे प्रतिस्पर्धी उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यावर आघाडी मिळवत धूळ चारली. तब्बल ४० वर्षांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राणे यांच्या विजयाने कमळ फुलले आहे. आपला हा विजय आपण रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील सर्व मतदारांना समर्पित करीत असल्याची प्रतिक्रिया ना. राणे यांनी विजयानंतर दिली आहे.

मतमोजणीच्या अखेरच्या २५ व्या फेरीनंतर राणे यांनी ४७ हजार ८५८ मतांनी विनायक राऊत यांचा पराभव करीत विजयाचा गुलाल उधळला. या निवडणुकीत नारायण राणे यांना ४ लाख ४८ हजार ५१४ तर राऊत यांना ४ लाख ६५६ मते मिळाली.
या विजयानंतर भाजपा महायुतीच्या कार्यर्त्यांनी एकच जल्लोष केला. ना. राणे यांच्या विजयाने कोकणला फक्त विकास हवा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान झाल्यानंतर नारायण राणे यांचा विजय निश्चित मानला जात होता. लीड किती मिळेल यावर अनेक ठिकाणी पैजाही लागल्या होत्या. मंगळवारी सकाळी ८ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला मिरजोळे एमआयडीसी येथे अन्न महामंडळाच्या वखारीमध्ये सुरुवात झाली. मतमोजणीच्या सुरुवातीपासून नारायण राणे यांनी मतांची आघाडी घेतली. आकडेवारी कमी-जास्त झाली तरीही किरकोळ अपवाद वगळता नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर आघाडी मिळवत दणदणीत विजय मिळवला.

या मतदार संघातून उबाठाचे उमेदवार म्हणून विनायक राऊत यांनी मतदानाच्या दोन महिने आधीपासूनच प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली होती. तर ना. राणे यांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला होता. मात्र असे असतानाही गेल्या ४० वर्षातील नारायण राणे यांची विकासाची भूमिका, महायुतीच्या कार्यकर्त्यांचे अखंड परिश्रम आणि मतदारांनी विकासाच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याने ना. राणे यांचा विजय झाला.
एक एक फेरीनिहाय ना. राणे यांची आघाडी वाढत असताना मतमोजणी नजीकच्या भाजपच्या पेंडोलमध्ये कार्यकर्त्यांची गर्दी वाढली. उमेदवार असलेले ना. राणे हे सकाळपासूनच मतमोजणीच्या स्थळी उपस्थित होते तर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सौ. नीलमताई राणे, माजी खासदार निलेश राणे, आ. नितेश राणे, माजी अमदार प्रमोद जठार, माजी आमदार बाळ माने, माजी आमदार राजन तेली, माजी आ. सदानंद चव्हाण, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संदीप कुरतडकर, भाजपा जिल्हाध्यक्ष रत्नागिरी राजेश सावंत, सिंधुदुर्ग प्रभाकर सांवत आदिंसह भाजपा महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभीपासूनच राणे यांनी आघाडी घेतल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातून भाजपा कार्यकर्ते आणि राणे परिवार प्रेमी मोठ्या संख्येने रत्नागिरीत दाखल झाले. ढोल-ताशे, गुलाल, फटाके यांच्या आवाजाने मिरजोळे एमआयडीसी परिसर दणाणून गेला होता.
सकाळपासूनच ना. नारायण राणे मतमोजणी कक्षात तळ ठोकून
मिरजोळे एमआयडीसी येथे अन्न महामंडळाच्या वखारीमध्ये सकाळी ८ वाजता मत मोजणीला सुरूवात झाली. त्यानंतर ९ वाजता महायुतीचे उमेदवार राणे यांचे मतमोजणी कक्षात आगमन झाले. सकाळी ९ पासून मतमोजणीची शेवटची फेरी होऊन विजयाचे प्रमाणपत्र घेईपर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल आठ तास राणे मतमोजणी कक्षात तळ ठोकून होते. विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह व सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर गावडे यांनी राणे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी बोलताना राणे यांनी या निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते यांचे आभार व्यक्त केले.
प्रशासनाचे सुयोग्य नियोजन
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रारंभापासूनच प्रशासनाने सुयोग्य असे नियोजन केले होते. मतमोजणी प्रसंगी मंगळवारी याची प्रचिती आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांसह असे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी अत्यंत चांगली कामगिरी बजावली. त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शांततेत पार पडली. रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, सिंधुदुर्ग जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद शिलवंत यांनी या निवडणूक प्रक्रियेत मीडियाशी अत्यंत चांगल्याप्रकारे सुसंवाद साधून माहिती पुरविली.
हा विजय मतदारांना समर्पित
विजयानंतर महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी पत्रकार कक्षात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपला हा विजय आपण समस्त रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील मतदारांना समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने कायमचं आपल्याला प्रेम आणि आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळेचे आजपर्यंत आपली यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यांच्या ऋणातून आपण कधीचं मुक्त होऊ शकत नाही. या निवडणुकीत देखील सिंधुदुर्गवासीयांनी मतदानाच्या रुपाने भरभरून दिलेल्या आशीर्वादाने आपण भारावून गेल्याची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली.
मनसेने वाटले पेढे
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे हे विजयी झाल्यानंतर मनसेच्या शहर कार्यकारिणीच्या वतीने शहरवासीयांना पेढे वाटून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कणकवलीतील प्रचार सभेमध्ये राणे यांच्या विजयाची ग्वाही दिली होती.
नारायण राणे यांनी घेतले सपत्नीक गणपतीपुळेत ‘श्रीं’चे दर्शन
मंगळवारी मतमोजणीपूर्वी सकाळी महायुतीचे उमेदवार नारायण राणे, सौ. नीलमताई राणे व कुटुंबीयांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे ‘श्रीं’चे मनोभावे दर्शन घेत विजयासाठी आशीर्वाद घेतले.












