ट्रॅक्टरद्वारे रस्त्यालगत टाकला जातोय कचरा, आरोग्याची समस्या आणखी गंभीर
खेड(प्रतिनिधी) खेड शहरातून दिवसाकाठी गोळा होणाऱ्या कचऱ्याची समर्थनगर येथे प्रक्रिया करून विल्हेवाट लावली जात आहे. यामुळे धुमसणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायम असतानाच येथे नव्या डम्पिंग ग्राऊंडची निर्मिती झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
समर्थनगर येथे रस्त्यालगत ट्रॅक्टरद्वारे इमारतींमधील चिखल व कचरा आणून टाकला जात असल्याने रहिवासी पुन्हा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. खेड शहरातून जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना नगरप्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एकीकडे कचरा प्रकल्पाचे घोंगडे भिजत पडलेले असतानाच दुसरीकडे नगरपरिषद समर्थनगर येथेच कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे.
मात्र समर्थनगर येथे कचऱ्याची विल्हेवाट लावताना संबंधित ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना मोठा फटका बसत आहे. बऱ्याचवेळा मोजकेच दिवस येथे येवून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात असल्योन सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय याचठिकाणी कचरा जाळल्याने नजिकच्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.










