शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची महत्वपूर्ण ‘साथ’
भाजपचे मजबूत संघटन : पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मेहनत
सावंतवाडी । सचिन रेडकर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात प्रथमच भाजपचे कमळ फुलले. केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी सलग दोन वेळा मोदी लाटेत निवडून आलेल्या खासदार विनायक राऊत यांचा तब्बल ४७ हजार मतांनी पराभव केला. या विजयामुळे कोकण हा राणेंचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. सिंधुदुर्ग जिल्ह्याने नारायण राणे यांच्या विजयात महत्वाचे योगदान दिले. त्यात कणकवली कुडाळ मतदारसंघाबरोबरच सावंतवाडी मतदार संघानेही मोलाचा हात दिला.
भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील मजबूत संघटन, भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत व त्याला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेली महत्वपूर्ण साथ यामुळे सावंतवाडी मतदारसंघात नारायण राणे यांना तब्बल ३१ हजार ७१९ मतांचे मताधिक्य मिळाले. राणे यांना ८५,३१२ तर राऊत यांना ५३,५९३ मते मिळाली. निकालाच्यावेळी प्रत्येक फेरीमध्ये सावंतवाडी मतदारसंघाने मताधिक्य मिळवून दिले. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेली तूट भरून काढत मताधिक्यात वाढ केली.
विशेष म्हणजे सावंतवाडी मतदारसंघातील सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग या तिन्ही तालुक्यांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यात सावंतवाडी तालुक्यात नारायण राणे यांना १५१५६ मताधिक्य मिळाले. यात राणे यांना ४५०१९ तर विनायक राऊत यांना २९८६३ मते मिळाली. वेंगुर्ले तालुक्यात राणे यांना ९७०२ मताधिक्य मिळाले यात राणेंना २५६२५ तर राऊत यांना १५९२३ मते मिळाली. तर दोडामार्ग तालुक्यात राणेंना ६८८६ मतांचे अधिक्य प्राप्त झाले. यात राणे यांना १४९६६ तर राऊत यांना ८०८० मते मिळाली. नारायण राणे यांच्या मागील ३४ वर्षांच्या राजकीय प्रवासात सावंतवाडी मतदारसंघातील मतदारांना त्यांना थेट मतदान करण्याची पहिलीच संधी मिळत असल्याने मतदारांनी राणे यांना भरभरून मते दिली. तसे पाहिले तर सावंतवाडी मतदारसंघाने नारायण राणे यांना नियमित साथ दिली आहे. मागील दहा वर्षांचा अपवाद वगळता तत्पूर्वी झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये येथील मतदार नेहमीच राणे यांच्या सोबत राहिला होता. मात्र, यावेळी थेट नारायण राणे यांना मतदान करण्याची संधी मिळत असल्याने मतदारांनी राणे यांना उस्फूर्तपणे मतदान केले. त्यामुळे काही अपवाद वगळता विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात राणे यांना मताधिक्य प्राप्त झाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर गद्दारीच्या आरोपासह फार मोठी टीका करण्यात आली. उबाठाचे युवराज आदित्य ठाकरे यांनी सावंतवाडीत सभा घेतली. त्यांनीही महायुतीचे उमेदवार नारायण राणे तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर सडकून टीका केली. आंबोली गेळेतील कबुलायतदार गावकर प्रश्न, वनसंज्ञा यासारख्या विषयावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. केसरकर व राणे यांच्या एकत्र येण्यावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मात्र, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्याला मतातून उत्तर दिले. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे व दीपक केसरकर यांनी घेतलेल्या वैयक्तिक सभेच्या व्यतिरिक्त कोणत्याही मोठ्या नेत्याची सावंतवाडीत सभा झालेली नसतानाही या मतदारसंघाने दिलेले मताधिक्य वाखाणण्याजोगेच आहे.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आपल्या मतदारसंघात या निवडणुकीत मोठी मेहनत घेतली. कोकणचा स्वाभिमान जपण्यासाठी तसेच केंद्रात पुन्हा मंत्रीपद प्राप्त करण्यासाठी राणे निवडून येणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी मतदारांना पटवून दिले. उन्हाळा वाढलेली गर्मी याचा कोणताही मुलाहीजा न बाळगता सावंतवाडी शहर, तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच शिरोडा रेडी वेंगुर्ला व दोडामार्ग येथे त्यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटी घेत मतदानाचे आवाहन केले. सावंतवाडीत झालेला महिला मेळावा तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झालेली प्रचार सभा यात देखील केसरकर यांचे महत्त्वाचे योगदान होते. केसरकर यांच्या समर्थक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील त्यांना मोलाची साथ दिली.
तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबरच ग्रामीण भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी संघटितपणे केलेला प्रचार देखील फळाला आला. निवडणूकीपूर्वीच मागील दहा वर्षात बांधलेले मजबूत संघटन, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, पन्ना प्रमुख यांच्या वारंवार घेतलेल्या बैठका तसेच निवडणूक काळात गावागावात घेतलेले मेळावे यामूळे मतदारांमध्ये उस्ताह निर्माण झाला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन व भाजपने या विधानसभा मतदारसंघात मागील काही वर्षात केलेली संघटनात्मक बांधणी देखील फलद्रूप ठरली.
तसेच मध्यंतरीच्या काळात अंतर्गत राजकारणातून अन्य पक्षात प्रवेशकर्ते झालेले अनेक राणे समर्थक कार्यकर्ते यावेळी राणे यांच्या प्रचारात सक्रीय सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गट, मनसे, आरपीआय आठवले गट व मित्र पक्षांनी दिलेली साथ देखील महत्वपूर्ण होती.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह सावंतवाडी तालुक्यात राणे यांना मिळालेले मताधिक्य पाहता सावंतवाडी शहरात मात्र त्या प्रमाणात खूपच कमी मतदान महायुतीला झाल्याचे दिसून आले. सावंतवाडी शहरात राणे यांना केवळ १८८ मताधिक्य मिळाले. शहरातील मुस्लिम बहुल भागात झालेल्या मतांच्या ध्रुवीकरणाचा मोठा फटका इथे भाजपला बसला. येथील एका केंद्रावर रात्री साडेसात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. हे एक गठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. येथील एका बुथवर तर भाजपला केवळ १२० तर राऊत यांना तब्बल ७०३ मते मिळाली. अन्य एका बुथवर युतीला २८५ तर आघाडीला ४३८ तर दुसऱ्या बुथवर राणेंना १३७ तर राऊत यांना ३९३ मते मिळाली. संविधान बदलणार असल्याच्या खोट्या प्रचाराला बळी पडल्याने देखील शहराच्या काही विशेष भागात महाविकास आघाडीला मतदान करण्यात आले. यामुळे महायुतीचे मताधिक्य घटल्याचे स्पष्ट झाले.
याउलट तिन्ही तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने मात्र नारायण राणे यांना मोठी साथ दिली. सावंतवाडी तालुक्याचा विचार करता तळवडे जिल्हा परिषद मतदार संघाने सर्वाधिक म्हणजे २१३४ तर माजगाव जिल्हा परिषदमतदार संघात ७०० चे मताधिक्य मिळाले. या मतदारसंघात देखील मुस्लिम मतदार महाविकास आघाडीकडे वळल्याचे दिसून आले. तर आंबोली जि.प. मतदारसंघात १७७८, माडखोल जि.प. मतदारसंघात १७४४, कोलगांव जि.प. मतदारसंघात १५७६, मळेवाड जि.प. मतदारसंघात १६०८, आरोंदा जि.प. मतदारसंघात १८७५, बांदा जि.प. मतदारसंघात १९२७, इन्सुली जि.प. मतदारसंघात १६२६ एवढे मताधिक्य मिळाले.
वेंगुर्ला तालुक्यातील तुळस जिल्हा परिषद मतदार संघात सर्वाधिक २६०६ मताधिक्य मिळाले. तर सावंतवाडी शहराप्रमाणेच वेंगुर्ला शहरात देखील केवळ ५०२ मतांची आघाडी मिळाली. परोळे जिल्हा परिषद मतदार संघात २१६६ तर रेडी जि.प. मतदारसंघात १५१८, उभादांडा जि.प. मतदारसंघात ११६३, आडेली जिल्हा परिषद मतदार संघात १७४७ मताधिक्य मिळाले.
दोडामार्ग तालुक्याने देखील नारायण राणे यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मुख्यमंत्री असताना दोडामार्ग तालुक्याची निर्मिती नारायण राणे यांनी केली होती. त्याबद्दल मतदारांनी राणे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केल्याचे दिसून आले. त्याचबरोबर आडाळी येथील एमआयडीसीत ५०० हून अधिक कारखाने आणून रोजगार मिळवून देण्याचे राणे यांनी दिलेले आश्वासन व विकासात्मक मुद्दे येथील मतदानांना भावले. या तालुक्यातील मणेरी जिल्हा परिषद मतदार संघात राणे यांना २५२५ तर माटणे जि.प. मतदार संघात २३५० एवढे मताधिक्य मिळाले. तर साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघात १३९९ तर दोडामार्ग शहरात राणे यांना ६१२ मतांची आघाडी मिळाली.
एकंदरीतच सावंतवाडी मतदारसंघातील मतदानाचा एकूण विचार करता ग्रामीण भागात महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याचे दिसून आले. महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच त्या त्या भागातील कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत फळाला आली. मतदानादिवशी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात महाविकास आघाडीचे बूथ देखील दिसून आले नव्हते. तर अनेक ठिकाणी शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्तांपेक्षा काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दिसून आले होते. त्यामुळे या मतदारसंघात उबाठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.










