विजेचा खेळखंडोबा सुरूच, पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा

राजापूर (प्रतिनिधी): शुक्रवारपासून तालुक्यात मान्सुन सक्रीय झाला असून शनिवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शहरासह ग्रामिण भागाला चांगलेच झोडपून काढले आहे. तर या पावसामुळे शहरासह ग्रामिण भागात अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. शहरात भटाळी येथे रस्त्यालगतची संरक्षण भिंत कोसळली असून ओगलेवाडी येथे आमकर घरानजीकची संरक्षण भिंत पुन्हा एकदा कोसळली आहे. तर मिठगवाणे शाळा नं. 3 ची संरक्षण भिंत कोसळली असून साखरीनाटे येथील अजरा हुना यांच्या कपांऊंड वॉलची भिंत कोसळली आहे. तालुक्यात शनिवारी 76.20 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. या वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत झाला आहे. तर या पावसामुळे राजापूर शहरासह तालुक्यात पाणी टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे.
शुक्रवार 7 जून पासूनच तालुक्यात मान्सून सक्रीय झाला आहे. शनिवार पासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाने दिलेला अंदाज खरा ठरला असून शनिवारी सायंकाळी पावसाने शहरासह ग्रामिण भागाला चांगलेच झोडपून काढले आहे.या पहिल्याच पावसाचा फटका शहरासह ग्रामिण भागात बसला असून राजापूर शहरात भटाळी येथील साने यांच्या घरानजीकची संरक्षण भिंत कोसळली आहे. तर ओगलेवाडी येथील प्रकाश आमकर यांच्या घरानजीक बांधलेली संरक्षण दुसऱ्यांदा कोसळली आहे. त्यामुळे या कामाबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
तसेच मिठगवाणे येथे शाळा क्रं. 3 ची संरक्षण भिंत कोसळली आहे. तर नाटे येथे अजरा हुना यांच्या कंपाऊंडची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या वतीने यावर तातडीने उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तालुक्यातील आपदग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश तहसिलदार शितल जाधव यांनी दिले आहेत.
विजेचा खेळखंडोबा सुरूच
मान्सुन पुर्व आणि मान्सून सुरू झाला तरी तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरात शुक्रवारी सायंकाळी भटाळी येथे विजवाहिन्यांवर वृक्ष कोसळल्याने भटाळी, आंबेवाडी व शहर भागात तब्बल 26 तास विजपुरवठा खंडीत झाला होता. तर शनिवारी देखील तालुक्याच्या अनेक भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच होता. कोदवली, नेरके परिसरात बारा ते चौदा तासांपेक्षा अधिक काळ विजपुरवठा ठप्प झाला होता. या भागात शनिवारी सायंकाळी 6 वाजता खंडीत झालेला विजपुरवठा रविवारी सकाळी 8 वाजता सुरू झाला मात्र वारंवार खंडीत होत होता. तर शहरात शनिवारी भटाळी येथील विजवाहिन्यांवर पडलेले झाड काढण्यासाठी दिवसभर विजपुरवठा सुरू होता. तर रविवारी राजापूर हायस्कुल नजीकची झाडे तोडण्यासाठी सकाळी 9 वाजल्यापासून भटाळी, आंबेवाडी साखळकरवाडी खांबलवाडी, धोपेश्वर पन्हळे या भागातील विजपुरवठा खंडीत ठेवण्यात आला होता.त्यामुळे विजग्राहकांचे मोठे हाल झाले.
महावितरणकडून पावसाळयापुर्वी देखभाल दुरूस्तीसह विजवाहिन्यांवर येणारी व लगत असलेली झाडे तोडण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात न आल्याने पावसाच्या सुरूवातीलाच शहरासह ग्रामिण भागातील जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.












