विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पराभव निश्चित!

शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार 35 हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार

शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे, राजा गांवकर यांनी व्यक्त केला विश्वास

मालवण | प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातील जनतेने उबाठा गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव करत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आता येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांनाही त्यांची जागा दाखवून दिली जाईल. आता नंबर आ. वैभव नाईक यांचा आहे. असा थेट इशारा शिवसेनेचे कुडाळ- मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे व तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.

दरम्यान, या विधानसभा मतदार संघात विनायक राऊत यांना मतदार संघातील जनतेने पूर्णपणे नाकारल्याचे दिसून आले. शिवाय राऊत यांच्या विजयासाठी आमदार नाईकांनी कामच केले नाही. असाही आरोप बबन शिंदे यांनी केला. राऊत यांना आपल्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून देण्यात आमदार नाईक हे अपयशी ठरले. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा. अशी बोचरी मागणीही शिंदे यांनी करत. उबाठा पक्षात असलेल्या अंतर्गत वादाचा फटका राऊत यांना बसल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ- मालवण मतदार संघात शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार 35 हजारांच्या मताधिक्याने विजयी होणार. असा विश्वास राजा गावकर, बबन शिंदे यांनी व्यक्त केला.

सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी बाबन शिंदे, राजा गांवकर यांसह तालुकाप्रमुख महेश राणे, उपतालुकाप्रमुख पराग खोत, महिला उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, तालुकाप्रमुख आशा वळपी, शहरप्रमुख गीता नाटेकर, विभागप्रमुख गीतांजली लाड, उपविभागप्रमुख भक्ती कवटकर, उदय गावडे, अरुण तोडणकर, श्रीहरी खवणेकर, विशाल आचरेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

बबन शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिले. त्यांच्या या विजयात कुडाळ- मालवण तालुक्यातील शिवसेना आणि भाजप महायुती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा खारीचा वाटा आहे. यापूर्वी येथे भाजपच्या निशाणीवर निवडणूक लढवली गेली नाही. मात्र यावेळी नारायण राणे यांच्या रूपाने कोकणात भाजपचे कमळ फुलले आहे. कुडाळ- मालवण मतदार संघातून मिळालेले मताधिक्य पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असून विद्यमान आमदारांसाठी हा धोक्याचा इशारा असेल. लोकसभा निवडणुकीत मिळालेले २८ हजाराचे मताधिक्य ३५ हजारापर्यंत कसे जाईल यादृष्टीनेही येत्या काळात मतदार संघात काम केले जाणार आहे.

राजा गावकर म्हणाले, महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांचे नाव घोषित केल्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, भाजपा नेते निलेश राणे, आ. नितेश राणे व सर्व प्रमुख नेते यांनी रणनीती आखत नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच ना. राणेंचा विजय झाला. विनायक राऊत यांच्यानंतर आता आमदार वैभव नाईक यांची वेळ आहे. त्यांना येत्या विधानसभेच्या निवडणूकित धूळ चारल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असे बबन शिंदे, राजा गावकर यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी येथून मताधिक्य कमी मिळाले. याठिकाणी मताधिक्य देण्यात महायुतीचे काम अपेक्षित झाले नाही. असा आरोप होत आहे. याबाबत विचारले असता बबन शिंदे, राजा गावकर म्हणाले, रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवाराचा सामंत बंधूंकडून प्रभावी प्रचार करण्यात आला. मात्र राणे यांना या जिल्ह्यातून मताधिक्य न मिळण्याची अन्य कारणे आहेत. यात विरोधकांकडून झालेला अपप्रचार हे प्रमुख कारण आहे. या अपप्रचाराला रत्नागिरीतील जनता बळी पडल्याने राणेंचे मताधिक्य घटल्याचे शिंदे, गावकर यांनी स्पष्ट केले.