रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील आरोग्य मंदिर येथे सोमवारी सायंकाळी 6.15 वा. सुमारास तीन वाहनांमध्ये झालेल्या विचित्र अपघातात दुचाकीचा चक्काचुर झाला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी (एमएच-20-बीएल-1488) ही एसटी तेथील स्टॉपवर प्रवासी उतरवण्यासाठी थांबली होती. त्याच सुमारास अॅक्टिव्हा (एमएच-08-एई-2748) वरुन शुभदा सुर्वे (भंडारपुळे) आणि अश्विनी बोरकर (भंडारपुळे) या दोघीजण कामावरून घरी मारुती मंदिरच्या दिशेने जात होत्या. त्या या एसटीच्या बाजुने पुढे जात असताना पाठीमागून येणार्या सिमेंट मिक्सरने ( एम एच 12 क्यूडब्लू 0374) या दुचाकीला धडक देत अपघात केला. मिक्सरची या दुचाकीला धडक बसल्याने दुचाकी एसटी आणि मिक्सरच्यामध्ये अडकून तिचा चक्काचूर झाला. सुदैवाने या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणी बचावल्या असून नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र दुचीकीची अवस्था पाहता हा अपघात भीषण असल्याचे दिसून येते. दुचाकी पूर्ण उलटी झाली असून दोन वाहनांमध्ये अधांतरी आहे. दुचाकीचा पुढचा स्टेअरिंगचा भाग बसच्या पुढच्या चाकाच्या मागच्या भागात अडकून चक्काचूर झाला आहे तर मागचा भाग मिक्सरच्या पुढच्या चाकाच्या मागील भागात अडकून नुकसान झाले आहे. यातूनच मिक्सर चालकाची बेदरकर वृत्ती दिसून येते.
दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या टिमसह घनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी अपघातग्रस्त दुचाकी बाजुला करुन खोळंबलेली वाहतुक सुरळीत केली. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.












