राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील भारतीय डाक विभागाच्या शाखा धाऊलवल्ली येथील खातेधारकांच्या रकमेचा अपहार केले प्रकरणी डाकपाल विजय कृष्णा भोवड(३१), रा. दसूर यांच्या विरोधात नाटे सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजापूर डाकघर निरीक्षक बालाजी हराळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, दिनांक ५/०८/२०२० ते १६/०३/२०२३ या कालावधीत भारतीय डाक विभाग शाखा धाऊलवल्ली, तालुका राजापूर, येथील डाकपाल विजय कृष्णा भोवड(३१), रा. दसूर तालुका राजापूर याने भारतीय डाक विभाग शाखा धाऊलवल्ली येथील खातेधारकांच्या खात्यामधून ७१,५०० रुपये रकमेचा अपहार केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्यावर संशयीत आरोपी यांनी सादर ७१,५०० रुपये किरकोळ सदरी जमा केले. परंतू सदर ७१,५००/- रुपये पैकी वरील एकूण ३६ खातेधारकांच्या खात्यात एकूण ५४,५००/- रुपये रकमेचा अपहार केल्याचे चौकशीअंती निष्पन्न झाल्याने भारतीय डाक विभागाच्या नियमानुसार अपहाराची रक्कम रुपये ५०,०००/- पेक्षा जास्त झाली असल्याने तक्रारदार यांनी त्याचे विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हा नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५०/२०२४ मध्ये भा. द. वि. स. कलम ४०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास नाटे पोलीस करीत आहेत.
—————————————————————-










