आमदार नितेश राणे यांच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांना सूचना
वाभवे – वैभववाडी न.पं. येथे विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न
वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी शहरातील नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होता कामा नये. प्रलंबित विकास कामे तात्काळ पूर्ण करून घ्या. कामे पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारांवर कारवाई केली जाईल. असा सज्जड दम आमदार नितेश राणे यांनी वाभवे – वैभववाडी न. पं. च्या बैठकीत दिला. शहरात कोट्यावधीच्या निधीतून मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लागली आहेत. पुर्णत्वास गेलेली कामे देखील जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना आमदार राणे यांनी दिल्या.
वाभवे – वैभववाडी न. पं. शहरातील विकास कामासंदर्भात आढावा बैठक येथील नगरपंचायत सभागृहात पार पडली. यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे , माजी सभापती भालचंद्र साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, तालुका महीला अध्यक्ष प्राची तावडे, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, प्रदीप रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संतोष पवार, नगरसेविका सुंदरा निकम, संगीता चव्हाण, सुभाष रावराणे, त्याचबरोबर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अतुल शिवनिवार, सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी श्री. जोशी, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे व अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नितेश राणे यांनी शहरात झालेल्या संपूर्ण कामांचा यावेळी आढावा घेतला. जवळपास 25 विकास कामे ही पूर्णत्वास गेली असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले. वैभववाडी शहरातील गटारे, संभाजी चौक सुशोभिकरण महामार्ग नजीकची गटारे आदी प्रलंबित कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. ज्या ठेकेदारांच्या नावावर कामे आहेत. त्यातील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. कोणतेही कारण चालणार नाही. कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्याचबरोबर पूर्ण झालेल्या कामाबाबत प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे. जनतेपर्यंत सदर कामे पोहचली पाहिजे. ती कामे पोहचवण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.
शहरातील शांतिनदी ते सुख नदी दरम्यानचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारित आहेत. या मार्गावरील गटारे तात्काळ साफ करून घ्या. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकारी अतुल शिवनिवार यांना दिल्या. येत्या दोन दिवसात महामार्गालगतची गटारे साफ केली जातील. असे शिवनिवार यांनी सांगितले.
तरेळे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर सूरु असलेल्या रस्ता रुंदीकरण कामाचाही आमदार नितेश राणे यांनी आढावा घेतला. तर घाट मार्गे वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल यावेळी करण्यात आला. अजून कामे अपुरी असल्याने त्याच बरोबर दरडी वारंवार कोसळत असल्याने घाट मार्ग असुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामे तात्काळ पूर्ण करा आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी पुर्ववत करा अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी दिल्या.












