कोकण पदवीधर निवडणुकीत विजय महायुतीचाच!

पालकमंत्री रवींद्र चव्हाण : भाजपा मालवण तालुका नियोजन बैठकित विजयी निर्धार

मोठे मताधिक्य आ. निरंजन डावखरे यांना मिळेल : भाजपा नेते निलेश राणे यांच्या विश्वास

मालवण | प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत कोकण प्रांतात जनतेने ठाकरे गटाला नाकारले. भाजपा महायुती उमेदवार विजयी झाले. आता लक्ष पदवीधर निवडूक हे असणार आहे. मोठ्या मताधिक्याने आ. निरंजन डावखरे यांना विजयी करूया. विजय महायुतीचाच असेल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मालवण येथे बोलताना केले.

कोकण विभाग पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजपा मालवण तालुक्याची नियोजन बैठक मालवण शहर दैवज्ञ भवन येथे पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासहित सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण कुडाळच्या जनतेने एकदा ठरवले की काहीही करू शकते. हे लोकसभा निवडणुकीत राणे साहेबांना मोठे मताधिक्य देऊन दाखवून दिले आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत येथील मतदार मोठे मताधिक्य आ. निरंजन डावखरे यांना देतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल. असा विश्वास भाजपा नेते निलेश राणे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनीही विचार मांडले.