लांजा । प्रतिनिधी : लांजा (बौद्धवाडी) येथील सुधाकर गोपाळ कांबळे यांच्या आंबा काजूच्या बागेमधील विहीरीमध्ये खवलेमांजर पडलेले बुधवार दि. १२ जून रोजी दुपारी ३.३० च्या दरम्यान आढळून आले.
या बाबत श्री. कांबळे यांनी वन विभाग लांजा यांच्याशी संपर्क साधल्यानंतर तात्काळ वनपाल लांजा, वनरक्षक लांजा व वनरक्षक कोर्ले यांनी जागेवर जावून पाहणी केली. सदर खवलेमांजर याला दोरीच्या साहाय्याने प्लॅस्टिक टोपले टाकुन सुरक्षितरित्या विहिरीबाहेर काढले. खवलेमांजर याची पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी लांजा यांचेकडून वैद्यकीय तपासणी करून ते सुस्थितीत असल्याची खात्री करुन त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
सदरची कार्यवाही ही श्रीम. गिरीजा देसाई, विभागिय वनअधिकारी (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), श्री.वै.सा. बोराटे, सहाय्यक वनसंरक्षक (प्रा) रत्नागिरी (चिपळूण), श्री.प्र.ग. सुतार, वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, यांचे मार्गदर्शनाखाली दि.वि.आरेकर, वनपाल लांजा, श्रीम.न.ह. कांबळे, वनरक्षक लांजा, श्रीम.श्रा.प्र.पवार, वनरक्षक कोर्ले व रेस्क्यु टिमचे श्री. अमित लांजेकर यांनी पार पाडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्रि क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने मा.श्री. प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी यांनी केले.










