दरड हटवण्याचे काम अद्यापही सुरूच
शुक्रवारी सायंकाळी दुचाकी व छोटया वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू
राजापूर | प्रतिनिधी : राजापुरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अणूस्कूरा घाटात सायंकाळी ७.३० वाजता कोसळली भली मोठी दरड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून युध्द पातळीवर सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळी या मार्गावरिल एका बाजुची दगड व माती काढून एका बाजुने दुचाकी व छोटया वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून देण्यात आली आहे. तब्बल २१ तासांनी छोटया वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
या घाटातील दरड व माती काढण्याचे काम शनिवारीही सुरू रहाणार असून शनिवारी सायंकाळ पर्यंत हा घाट वाहतुकीसाठी निर्धोकपणे सुरू होईल असा दावा बांधकाम विभागाने केला आहे.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा घाट म्हणून अणूस्कुरा घाटाची ओळख आहे, पावसाच्या सुरुवातीलाच या घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्याने भविष्यात या घाटातील वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसाच्या सुरूवातीलाच घाटात दरड कोळल्याने यापुढे अतिवृष्टी काळात या मार्गावरिल वाहतुक धोकादायक ठरणार असून यासाठी प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन व उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
गुरूवारी सायंकाळी राजापूर शहर आणि तालुका परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अणुस्कुरा घाटात दरड कोसळली व या मार्गावरिल वाहतुक ठप्प झाली. घाटातील रस्त्याच्या डोंगरावरील माथ्यावरून भले मोठे दगड व माती रस्त्यावर आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
सायंकाळी घाटात दरड कोसळल्याचीमाहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे, शाखा अभियंता स्वप्नील बावधनकर यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ ठेकेदार उपेंद्र शेटये यांना त्यांची टीम व आवश्यक ते साहित्य घेऊन बोलावण्यात आले व रात्रीच दरड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. मात्र रात्री पावसामुळे दरड हटविण्यास अडचणी येत होत्या. रात्रीच राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, रायपाटण दुरक्षत्राचे पोलीस हवालदार कमलाकर तळेकर, पोलीस नाईक सचिन वीर, पोलीस शिपाई कोळी, कात्रे, माने, बळीप आदी देखील घटनास्थळी पोहचले व दरड काढण्याच्या कामाबाबत नियोजन करत सहकार्य केले. तर वाहतुक अन्य मार्गाने वळविण्याबाबत नियोजन केले. दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला या मार्गावरील सर्व वाहतूक आंबाघाट मार्गे वळवण्यात आली.
मात्र शुक्रवारी सकाळपासूनच दरड हटवण्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. या ठीकाणी अडथळा ठरणारे दगड ब्लास्टींग करून फोडून काही दगड फोडून बाजुला करण्यात आले. बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पोलीस प्रशासन या ठीकाणी जातीनीशी लक्ष ठेऊन आहेत. घाटातुन मोठ मोठया दगडी रस्त्यावर आल्याने रस्यावरही मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे कामालाही वेळ लागत आहे. मात्र प्रशासनाकडून याही परिस्थितीत काम युध्द पातळीवर सुरू आहे. तहसीलदार सौ. प्रतिभा जाधव यांनी शुक्रवारी सकाळी अणूस्कुरा घाट स्थळी भेट देत पहाणी केली.
शुक्रवारी सायंकाळी या मार्गावर एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र तरीही अद्याप दरडीचा काही भाग काढणे बाकी असून शनिवारीही हे काम सुरू रहाणार आहे. शनिवारी सायंकाळ पर्यंत पुर्णपणे दरड, माती व दगड बाजुला करून हा रस्ता निर्धोकपणे वाहतुकीला सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
सध्या केवळ छोटया वाहनांसाठी एकेरी वाहतुक सुरू करण्यात आली असून वाहन चालकांनी घाटातुन वाहन चालवियात दक्षता घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.












