खेड(प्रतिनिधी)पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या साथींच्या निवारणासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून सर्वच आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय पथकांची स्थापना तसेच साथरोग नियंत्रण कृती योजना तयार करण्यात आली आहे.
किंजळे, मुसाड, बोरज, तिसंगी जांभुळगाव या साथग्रस्त
गावांसह २४ जोखिमग्रस्त गावांवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. खरटमोल यांनी दिली.
तालुक्यात ८ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथींच्या विविध आजारांना आळा घालण्याबरोबरच प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने प्रत्येक आरोग्य केंद्रावर स्वतंत्र वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली मास सर्व्हेसाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत असलेले डास व अळी सर्व्हेक्षणाचे काम देखील पूर्ण झाले असून जनजागृती करण्यावर भर देण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदतीला तालुकास्तरीय साथ रोग नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. ए. खरटमोल, आरोग्य पर्यवेक्षक नरेश इदाते, आरोग्य सहाय्यक एस. एच. सुर्वे, आरोग्यसेवक ए. आर. तटकरी, परिचर एम. बी. डिंगोरे यांचा समावेश आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी वैद्यकीय पथकांची स्थापना करून एक आरोग्यसेवक व आरोग्यसेविका तैनात राहणार असून नैसर्गिक आपत्ती व पूर या ठिकाणी तातडीने भेटी देवून उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत.बोरघर, खवटी, चिंचघर-प्रभुवाडी, चाकाळे, कशेडी, सुमारगड, उथळे बुद्रुक, भरणे, सुकिवली, कळंबणी बुद्रुक, चाटव, अस्तान, नांदिवली, सापिर्ली, चोरवणे, कोतवली-टेपवाडी, शेल्डी- हेदवाडी, पायरवाडी, सोनगाव- धनगरवाडी, अलसुरे -मोहल्ला, आयनी भोईवाडी, लवेल- गणवालवाडी, शिव बुद्रुक भोईवाडी, आष्टी- मोहल्ला आदी २४ जोखीमग्रस्त गावांवर आरोग्य प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्या-त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.










