पणन महासंघाच्या मार्केटिंग अधिकारी कार्यालयासाठी ओरोस येथे जागा उपलब्ध करून द्या

 

पणन महासंघाचे संचालक प्रमोद रावराणे यांची पालकमंत्री श्री चव्हाण यांच्याकडे मागणी

वैभववाडी | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकारी पणेन महासंघ मर्यादित मुंबईच्या जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गसाठी सिंधुदुर्गनगरी (ओरोस) येथे प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून द्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड मुंबई ९ ही राज्यातील सहकारी संस्थांची शिखर संस्था आहे. संस्थेचे कामकाज महाराष्ट्र शासनाच्या प्रशासकीय नियंत्रणात चालते.

 

संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयामार्फत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धान्य खरेदी केली जाते. तसेच शेतकऱ्यांच्या हितार्थ, निगडित शासनाच्या या कार्यालयाशी संबंधित सर्व योजना राबवल्या जातात. धान्य खरेदीचे कामकाज हे जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे कामकाजाच्या अनुषंगाने वारंवार जिल्हा पुरवठा शाखा, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय येथे ये -जा करावी लागते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत आहे. सध्या मार्केटिंगचे कार्यालय ओरोस येथे खाजगी इमारतीत भाडेतत्त्वावर आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय करीता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी प्रशासकीय इमारतीत जागा उपलब्ध करून द्यावी असे संचालक प्रमोद रावराणे यांनी निवेदनात म्हटले आहे.