म्हापण येथे दुचाकी आणि जेसीबी मध्ये अपघात : दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू

वेंगुर्ले : दाजी नाईक

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथे सायंकाळी उशिरा सुरू असलेल्या मुसळधार पावसावेळी मुख्य रस्त्यावर दुचाकी आणि जेसीबी यांच्या मध्ये अपघात झाला. या अपघाता मध्ये कोचरा येथील दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाता बाबत नोंद करण्याचे काम निवती पोलीस ठाण्यात सुरू आहे.

आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान म्हापण – पाट रस्त्यावर कोचरे रवळनाथवाडी येथील मधुकर उर्फ बंटी प्रदीप बिलये (वय 30) हा आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याने जेसीबीला ठोकल्याने हा अपघात झाला. त्याच्या डोक्याला मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यांचा मृतदेह ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला असून, उद्या कुडाळ येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे निवती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.