अणूस्कुरा घाट व अर्जुना धरणक्षेत्राचीही केली पहाणी

राजापूर (प्रतिनिधी):नैसर्गिक आपत्ती काळात सर्व प्रशासकिय यंत्रणांनी अधिक सतर्क व सजग रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रशासनाला दिल्या. रविवारी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी राजापूर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. या बैठकीनंतर त्यांनी अणूस्कुरा घाट दरड प्रवण क्षेत्र व अर्जुना धरण प्रकल्पस्थळाची पहाणी केली.
राजापूर प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या या आढावा बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, राजापूर प्रांताधिकारी वैशाली माने, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे, राजापूर तहसीलदार सौ. शीतल जाधव, लांजा तहसीलदार प्रमोद कदम, राजापूर पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण, राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले आदींसह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
याप्रसंगी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आरोग्य, बांधकाम, कृषी, महसुल प्रशासकिय विभागांनी नैसर्गिक आपत्ती काळासाठी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. राजापूर तालुक्यात कशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती काळासाठी नियोजन करण्यात आले आहे याबाबत प्रांताधिकारी वैशाली माने यांनी माहिती दिली. तर राजापूर शहरातही कशा प्रकारे आपत्ती काळात नियोजन करण्यात आले आहे याबाबतही माहिती दिली. यावेळी तालुक्यातील दरड प्रवण क्षेत्र व तेथील परिस्थितीचाही त्यांनी आढावा घेतला.
नैसर्गिक आपत्ती काळात सर्व प्रशासकिय विभागांनी दक्ष रहावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी सिंह यांनी दिल्या.
या बैठकीनंतर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी अणूस्कुरा घाटामध्ये रस्त्यावर दरड कोसळलेल्या ठिकाणास भेट देऊन पाहणी केली व संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना दिल्या तसेच अन्य धोकादायक ठिकाणांचीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता शंतनू दुधाडे व अधिकारी उपस्थित होते.
तर यावेळी अजुर्ना धरण क्षेत्राचीही जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी प्रत्यक्ष पहाणी केली व केलेल्या उपाययोजबांबत माहिती घेतली.









