हातखंबा येथे आणखी एक अपघात; डंपर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

रत्नागिरी ः प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील अपघात सत्र काही थांबता-थांबत नाही. गुरुवारी सायंकाळी 5 वा.सुमारास हातखंबा पीर येथील तीव्र उतारात पुन्हा एक डंपर पलटी होउन अपघात झाला.
बुधवारी सकाळी या परिसरात ट्रेलर पलटून अपघात झाल्याची घटना झाली होती. त्या अपघातामुळे तब्बल अडीज तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुक खोळंबली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा हा अपघात झाला. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुरुवारी सायंकाळी या रस्त्यावर जाणाऱ्या चालकाचा डंपरवरील ताबा सूटला त्यामुळे डंपर रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र डंपर पलटी झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. दरम्यान, ग्रामीण पोलिसही घटनास्थळी पोहचले होते. त्यांना क्रेनच्या सहाय्याने डंपर रस्त्याच्या बाजुला करुन वाहतुक पूर्ववत केली.