खेड (प्रतिनिधी)
तालुक्यातील कशेडी – बाववाडी येथील रहिवासी व भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या सुजित शिवाजी दरेकर (४३) यांचे रविवारी ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सुजित दरेकर यांनी खवटी न्यू इंग्लिश स्कूल येथे इयत्ता १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यदलात रुजू झाले. १५ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कारगिल युद्धातही मौलिक कामगिरी बजावली होती. सेवानिवृत्तीनंतर गावी दाखल झालेले दरेकर हे शेती व्यवसायात गुंतले होते.
रविवारी सकाळच्या सुमारास त्यांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाळी निधनाने सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.











