दापोली l प्रतिनिधी: दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजला जातो, या दापोली तालुक्यामध्ये दरवर्षी हजारो पर्यटक हे येत असतात परंतु दापोलीत आरोग्यच्या समस्या फार बिकट असून दापोलीच्या आरोग्याचे केंद्रबिंदू समजले जाणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये तज्ञ डॉक्टरांची पदे गेली अनेक वर्ष रिक्त आहेत. जिल्हा रूग्णालयानंतर दुसरा नंबरचे रुग्णालय म्हणून दापोली उपजिल्हा रुग्णालयाकडे पाहिले जाते. जिल्हा रुग्णालय नंतरची सर्वात जास्त ओपीडी व आयपीडी ही दापोली उपजिल्हा रुग्णालयाची असुन गेली अनेक वर्ष दापोली उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार बी.एम.एस डॉक्टरांकडे आहे. दापोली मध्ये एखादी मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदार अधिकारीच नाहीत अशी अवस्था निर्माण झाली आहे. सध्यस्थितीला 7 वैद्यकीय अधिकारी आणि 1 वैद्यकीय अधिक्षक अशी 8 पदे असुन यांच्यापदांपैकी 2 पदे (एम.बी.बी.एस) पदे भरली आहेत. त्यापैकी एकाकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. यामध्ये एकही तज्ञ पद नाही. तर वैद्यकीय अधिक्षक हे अतिरिक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
या उपजिल्हा रुग्णालयामध्ये गेली अनेक वर्ष विविध तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त असल्याने दापोली तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दोन वेळा आमरण उपोषणाचा हत्यार उपसण्यात आले होते त्यावेळेला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खा. सुनिल तटकरे, स्थानिक आ. योगेश कदम आणि जिल्हा शल्य चिकित्सक, यांचेकडुन आश्वासन देऊन तात्पुरत्या स्वरूपात एका डॉक्टरांची नियुक्ती काही दिवसांकरीता झाली होती परंतु त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली ती आजपर्यंत. आजमितीला दापोली उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्वच तज्ञ डॉक्टरांचे पदे रिक्त आहे त्यामध्ये प्रामुख्याने कायमस्वरूपी स्त्री रोग तज्ञ, भूलतज्ञ, फिजिशियन, सर्जन, बालरोगतज्ज्ञ हि पदे गेल्या कित्येक वर्ष रिक्त आहेत या रिक्त पदांचा पाठपुरावा करण्यात अद्यापही दापोली मधील कुठल्याही लोकप्रतिनिधीना यश आलेले नाही.












