राजापूर तालुका खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांसाठी खते, बि -बियाणे, शेती अवजारे उपलब्ध

सिंधुरत्न योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील शेतकऱ्यांना मोफत धान्याचा लाभ

राजापूर (वार्ताहर): शासनाच्या वतीने चालु खरीप हंगामात शेतकऱ्यांना अडचणी येवू नयेत यासाठी खरेदी विक्री संघामार्फत मुबलक भात बियाणे, खते, शेती अवजारांची उपलब्धता करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यात राजापूर तालुका खरेदी विक्री संघामार्फत शेतकऱ्यांना खते व बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली असून सुधारीत जातीच्या संकरीत बीयाण्यांना शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. यावर्षी तालुक्यात ११० क्विंटल भात बियाणे खरेदी विक्री संघामार्फत वितरण करण्यात आले.

 

 

यावर्षी हंगामाच्या सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने बळीराजाही सुखावला असून शेतीच्या कामांनी वेग घेतला आहे. शेतकऱ्यांना वेळेवर भात बियाणे उपलब्ध होण्यासाठी खरेदी विक्री संघामार्फत मुबलक भात बीयाणे उपलब्ध करण्यात आली. तर सिंधुरत्न योजनेअंतर्गत दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत धान्य उपलब्ध झाले होते. तालुक्यातील 98 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. सुमारे ११६७ किलो बीयाणे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आल्याची माहीती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक दिपक कानविंदे यानी दिली.
तसेच चालु हंगामाकरिता विविध जातीचे १६७ क्विंटल बियाणे संघामध्ये उपलब्ध झाले होते पैकी ११० क्विंटल बियाण्यांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. त्यामध्ये रत्ना ८, रत्ना ६, सुवर्णा, एचएमटी, सोनम, सारथी, कोमल, रूपाली, मधुमती या बियाण्यांना शेतकऱ्यांची मागणी होती. गेल्या काही वर्षात सुधारीत संकरीत बियाणी खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून त्यातून जास्तीत उत्पन्न शेतकरी घेवू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे भात बियाणे उपलब्ध केले जात असल्याचे कानविंदे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना भात पेरणीसाठी तुटवडा निर्माण होणार नाही याची काळजी शासनामार्फत घेतली जात आहे.

 

 

भात बियाण्यांबरोबरच शेतकऱ्यांना युरिया, सुफलासारखी खते अनुदानावर उपलब्ध करण्यात आली आहेत. राजापूर तालुका खरेदी विक्री संघामार्फत युरिया ६०२ टन, सुफला १८० टन, मिश्र ८२ टन, सुपर फॉस्पेट, तसेच अन्य सेंद्रीय अशी सुमारे १०६० टन खत सुरूवातीला उपलब्ध करण्यात आली. या खतांना शेतकऱ्यांची मोठी मागणी असून मागणीनुसार खते उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे कानविंदे यानी सांगितले.
तसेच खते, बी बियाणे याबरोबच शेती अवजारांची उपलब्धा संघामध्ये करण्यात आली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहनही श्री. कानविंदे यांनी केले आहे