राजापूरात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची धडक कारवाई
परवटली गावातील त्या व्यक्तीचा सततचा सहभाग उघड
पोलीस प्रशासन ठोस कारवाई कधी करणार? जनतेचा सवाल
राजापूर प्रतिनिधी : ऐन गणेशोत्सव सणातच स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने तालुक्यात अवैध रित्या गुरांची वाहतुक करणाऱ्या तीन जणांवर धडक कारवाई करत १९ गुरांची नुकतीच मुक्त्तता केली. या कारवाईमुळे पुन्हा एकदा राजापूर तालुक्यातील अवैध गुरे वाहतुकीचा मुद्दा ऐरवणीवर आला आहे. गेले कित्येक वर्षे अशा प्रकारे तालुक्यात अवैध गुरांच्या वाहतुकीचे प्रकार वारंवार घडत असून यामध्ये परटवली गावातील एका व्यक्तीचा नेहमीच सहभाग असल्याचेही पोलीस कारवाईत उघड होत आहे. मग पोलीस प्रशासनाकडून या विरोधात कठोर कारवाई का केली जात नाही? तालुक्यातील या अवैध गुरे वाहतुकीला पोलीस प्रशासन आळा घालणार की नाही? असे सवाल जनतेतुन उपस्थित केले जात आहेत.
राजापूर तालुक्यात वारंवार अशा प्रकारे अवैध गुरे वाहतुकीच्या घटना घडत आहेत. यामध्ये मोठे रॅकेट कार्यरत असून अशा प्रकारे गुरांची खरेदी करून ती पश्चिम महाराष्ट्रात विकली जात असल्याची बाबही पुढे आलेली आहे. ऐन गणेशोत्सव सणातच स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने पाचल भागात अणूस्कुरा चेकपोस्टवरच अशा प्रकारे अवैध रित्या गुरांची वाहतुक करणाऱ्या तीन जणांवर धडक कारवाई करत १९ गुरांची मुक्त्तता केल्याने पुन्हा एकदा राजापूर तालुक्यातील अवैध गुरे वाहतुकीचा मुद्दा ऐरवणीवर आला आहे. या कारवाईतही तालुक्यातील परटवली गावातील एका व्यक्तीसह तीन जणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. मात्र गेल्या अनेक वर्षात झालेल्या विविध अवैध गुरे वाहतुकीच्या कारवाईत परटवली गावातील ती व्यक्ती कायम सहभागी असल्याचे दिसून आलेले आहे. मात्र त्या व्यक्तीविरोधात पोलीस प्रशासन ठोस कारवाई का करत नाही असाही सवाल उपस्थित केला जात आहे. तर अशा प्रकारे गुरांची खरेदी विक्री करणारे दलाल यांचा पोलीस का शोध घेत नाहीत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत राजापूर पोलीस प्रशासनाने भविष्यात गांभीर्याने लक्ष देऊन या अवैध गुरे वाहतुक करणाऱ्या रॅकेटचा परदापाश करून तालुक्यातुन या प्रकारचे समुळ उच्च्चाट करावे अशी मागणी होत आहे.












