शिवणेबुद्रुक मध्ये तीन विजपोल पडले
वाळवड शाळेची जुनी इमारत कोसळली

राजापूर l प्रतिनिधी : गेले दोन दिवस काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसान गुरूवारी चांगलाच जोर धरला. गुरूवारी सकाळपासूनच राजापूर शहर आणि तालुका परिसरात वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या मुसळधार पावसात तालुक्यात शिवणे बुद्रुक ब्राह्मण वाडी येथे पांडुरंग बागाव यांच्या घराशेजारी महावितरणचे तीन विज पोल उन्मळून पडले असून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. तर जोरदार वारा व मुसळधार पावसामुळे जि.प.वाळवड शाळेच्या नविन इमारत नजिक असलेली जूनी इमारत कोसळली आहे. तर अनेक भागात पडझड झाली असून विजपुरवठा खंडीत झाला आहे.
तालुक्यात ७ जून पासूनच मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून पेरणीची कामे पुर्ण झाली आहेत. गेले दोन ते दिन दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने तापमानातही वाढ झाली होती. मात्र गुरूवारी सकाळपासूनच पावसाने शहरासह ग्रामीण भागात चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे ग्रामीण भागात काही ठिकाण पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शिवणे बुद्रुक ब्राह्मण वाडी येथे पांडुरंग बागाव यांच्या घराशेजारी महावितरणचे तीन विज पोल उन्मळून पडले असून विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. . महावितरणकडुन तातडीने दखल घेण्यात आली असून विजपुरठा बंद करून काम हाती घेण्यात आले आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. तर वाळवड येथे शाळेची जुनी इमारत कोसळली आहे. मात्र नवीन इमारतीत शाळा सुरू असल्याने व जुन्या इमारतीचा कोणताही वापर नसल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.
तालुक्यात झालेल्या या पडझडीबाबत व नुकसानीबाबत तहसीलदार सौ. शीतल जाधव यांनी पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तर नदीकिनाऱ्यालगतच्या नागरिकांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत.










