खड्यांमुळे वाहनचालकांची कसरत; महामार्ग जनआक्रोश समिती छेडणार रास्ता रोको आंदोलन
खेड(प्रतिनिधी) मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षापासून रखडले आहे. धिम्या गतीने सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहनचालकांचा मनस्ताप अजूनही कायम आहे. त्यातूनच जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. रखडलेल्या महामार्ग कामाच्या गतीसाठी आठवडाभराची ‘डेडलाईन’ देतं तसे न झाल्यास महामार्गावरील पळस्पे ते रत्नागिरीदरम्यान रास्ता
रोको आंदोलन छेडण्याचा इशारा महामार्ग जनआक्रोश समितीने दिला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या झालेल्या रखडपट्टीसह निकृष्ट दर्जाचे ‘बांधकाम, अपूर्णावस्थेतील काम व जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे यंदाच्या पावसाळ्यातही वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. महामार्गाच्या कामाला गती देण्यासाठी सातत्याने विविध संघटनांनी आंदोलने छेडून सरकारला जागे करण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी दिलेली आश्वासने हवेतच विरली आहेत. महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महामार्गावरून प्रवास नको रे बाबा… अशी म्हणण्याची वेळही वाहनचालकांवर येवून ठेपली आहे. डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतरही डिसेंबर २०२४ देखील देण्यात आलेली मुदत हुकल्यानंतर राज्य सरकारने उच्च न्यायालयाकडे मुदत वाढवून मागितली होती. मात्र तरीही महामार्गचि काम अपूर्ण अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला पुन्हा जागे करून कामाला गती देण्यासाठी महामार्ग जनआक्रोश समितीने ७ दिवसांची मुदत दिली. या बाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाही पत्र देण्यात आल्याचे सांगण्यात आले.










