The protest of Kurang Gramseva Sangh Mumbai on April 12 has been suspended for the time being
30 एप्रिल पासून पुलाच्या कामाला होणा सुरुवात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे लेखी पत्र
लांजा तहसीलदार कार्यालयात पार पडली बैठक
लांजा | प्रतिनिधी : मंगळवारी ११ एप्रिल रोजी लांजा तहसील कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ३० एप्रिल पर्यंत कुरंग येथील नावेरी नदीवरील पुलाच्या कामाला सुरुवात होईल असे सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांचे पत्र उपोषणकर्त्या कुरंग ग्रामस्थ आणि कुरुंग ग्रामसेवा संघ या पदाधिकाऱ्यांना दिल्याने बुधवारी १२ एप्रिल रोजी होणारे आंदोलन ग्रामस्थांनी तूर्तास मागे घेतले आहे.तालुक्यातील कुरंग येथील नावेरी नदीवरील नाबाड २४ अन्तर्गत मंजूर झालेल्या पुलाचे काम ठेकेदाराने अर्धवट पूर्ण केल्याने हे काम गेल्या दोन वर्षापासून रखडलेल्या स्थितीत होते. त्यामुळे कुरंग येतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने ग्रामस्थांनी शासन संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील या पुलाचे काम रखडलेले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी १२ एप्रिल रोजी नावेरी येथील उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर लांजा तहसील कार्यालय या ठिकाणी तहसीलदार प्रमोद कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुरंग ग्रामसेवा संघ आणि ग्रामस्थ यांची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला लांजा बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री भारती हे उपस्थित होते .यावेळी तहसीलदार प्रमोद कदम यांनी ग्रामस्थांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता यांचे लेखी पत्र ग्रामस्थांना देण्यात आले. यामध्ये सदर पुलाचे काम ठेकेदाराने उर्वरित वेळेत पूर्ण न केल्याने त्याच्याकडून ठेका काढून घेण्यात आलेला आहे .उर्वरित कामाच्या निविदा ११ एप्रिल रोजी ऑनलाइन प्रणाली द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या असून निविदा प्राप्त होण्याची तारीख ही १८ एप्रिल रोजी पर्यंत आहे. २० एप्रिल रोजी कंत्राटदारांकडून प्राप्त झालेल्या निविदा उघडण्याची कार्यवाही होईल आणि त्यानंतर आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून दिनांक ३० एप्रिल अखेर रखडलेल्या पुलाचे काम सुरू होईल असे ठोस आश्वासन या निवेदनाद्वारे ग्रामस्थांना देण्यात आले आहे.
या लेखी पत्रामुळे अखेर कुरंग ग्रामसेवा संघ आणि ग्रामस्थ यांनी १२ एप्रिल रोजीचे उपोषण अखेर मागे घेतले आहे .या बैठकीला कुरंग सरपंच-तानाजी जाधव,संतोष कदम, अमोल कदम, विजय कदम, पोलीस पाटील-पंढरी चव्हाण, संजय विश्वासराव, संतोष सुर्वे, विलास चाळके, मनोहर चाळके, पांडुरंग आयरे, पुंडलिक कदम,जनार्दन गुरव संतोष चाळके, गणेश सुर्वे, प्रमोद जाधव, योगेश साळवी, राजू कदम, त्रिवेणी राणे, सुनिल कदम, नरेश चव्हाण, सुभाष नाटेकर, राजाराम पवार, शाम साळवी, विजय चाळके, राखी चव्हाण, रामचंद्र कदम आदी उपस्थित होते.