मंडणगड पोलिसांची यशस्वी कामगिरी
तालुक्यातून पोलिसांचे कौतुक
मंडणगड l प्रतिनिधी : मंडणगड शहरातून चोरण्यात आलेली दुचाकी मुद्देमालासह दुचाकी चोरास 24 तासाच्या आत ताब्यात घेत अटक करण्याची कौतुकास्पद कामगिरी मंडणगड पोलिसांनी केली आहे. त्यांच्या या कार्यतत्पर आणि कर्तव्यनिष्ठेचे मंडणगड तालुक्यातून कौतुक करण्यात येत आहे.
या घटनेसंदर्भात पोलीस ठाणे मंडणगड येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शहरातील सरकारी गोडाऊन येथे हिरो होंडा कंपनीची सीबीझेड मोटारसायकल नंबर एम. एच. 08 एक्स ६१४६ हि राजाराम महादेव लेंडे यांच्या मालकीची दुचाकी उभी करण्यात आली होती. दि, २३ जून २०२४ रोजी सकाळी ७ वा. सदर गाडी हि त्या जागेवरून चोरीस गेली असल्याचे श्री. लेंडे यांच्या निदर्शनात आले, यामुळे राजाराम लेंडे यांनी तत्काळ मंडणगड पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मंडणगड पोलिसांनी तपास यंत्रणा कार्यान्वित करीत शहरातील चौकाचौकात सगळीकडे तत्काळ नाकाबंदी लावली. यावेळी कसून तपास करीत असताना दरम्यान, त्याच रात्री १२.३० च्या सुमारास संशयित आरोपीत इरफान सिराज मोमीन ( वय २८ ) रा. धुत्रोली मोहल्ला, ता. मंडणगड याच्या ताब्यात सदरची गाडी मिळून आल्याने पोलिसांनी गाडीबाबत त्याच्याकडे आपला पोलिसी खाक्या दाखवत अधिक चौकशी केली. या चौकशीत सदर संशयित इसमाने आपण हि दुचाकी मंडणगड गौडावून येथून चोरली असल्याची कबुली दिली. त्याला पोलिसांनी मुद्देमालासाहित ताब्यात घेत अटक केली आहे. या गुन्ह्याबाबत अधिक तपास पोलीस हेड काँस्टेबल दत्ताराम शांताराम बाणे करीत आहेत.
सदर तपासाची मोहीम पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँस्टेबल दत्ताराम शांताराम बाणे, पोलीस हेड काँस्टेबल एस. पी. मावची, पोलीस काँस्टेबल वैभव गमरे, पोलीस पाटील रमेश जाधव यांनी आपला सहभाग नोंदवत यशस्वीपणे पार पाडली. त्यांचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.












