दिव्यांग बंधु धावला दिव्यांग भगिनींच्या मदतीला

 

एक दिव्यांगच दिव्यांगांचे दुःख जाणू शकतो : विनोद धुरी

सावंतवाडी । प्रतिनिधी : वडिलांनंतर आईचेही छत्र हरपल्याने निराधार झालेल्या माजगांव येथील तीन गतिमंद दिव्यांग डिमेलो भगिनींच्या
मदतीला अखेर एक दिव्यांग बंधूच धाऊन आला.
डिमेलो भगिनींवर ओढावलेल्या परिस्थितीबाबत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनानंतर अवघ्या दोन दिवसातच काळसे गावातील काळसे पंचक्रोशी अपंग संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने थेट माजगांव गाठत तिन्ही बहिणींची विचारपूस करून त्यांना किमान दोन महिने पुरतील अशा जिवनावश्यक वस्तू भेट दिल्या. स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांगांच्या मदतीसाठी विनोद धुरी करीत असलेल्या कार्याबद्दल उपस्थित सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्याला सलाम केला.

 

 

विनोद धुरी यांनी या तिन्ही बहिणींची हस्तेने विचारपूस करीत त्यांना मानसिक आधार देखील दिला. यापुढेही जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल त्यावेळी तुम्ही मला नक्की कळवा मी आपल्याला अवश्य मदत करेन, अशी ग्वाही दिली. त्याचप्रमाणे सद्यस्थितीत पावसाळी वातावरणात हवेत पसरलेला गारठा व या भगिनींच्या घरात साधे अंथरूण- पांघरूणही नसल्याचे पाहून त्या दिव्यांग भगिनींसाठी तीन गाद्या, बेडशीट, चटई व कपडे येत्या आठ दिवसात देईन, असेही आश्वासन दिले.
एक दिव्यांगचं दिव्यागांच्या वेदना समजू शकतो. यासाठी मी काळसे येथे दिव्यांगांची संस्था सुरू केली. सदर संस्था दिव्यांगांनी दिव्यांगांसाठी चालवलेली एक संस्था आहे. गेली अकरा वर्ष आपण दिव्यांगांसाठी रात्रंदिवस काम करत आहे. त्यासाठी मला माझे सहकारी दिव्यांग मित्र अनिल पाटील, विनायक चव्हाण, उर्मिला चव्हाण व निलेश हडकर यांचे नेहमीच मोलाचे सहकार्य लाभते. यापुढे देखील आम्ही अशाच प्रकारे मदत करू असे ते म्हणाले.
याप्रसंगी सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर ,रवी जाधव ,रूपा मुद्राळे व रमिजा दुर्वेश,उपस्थित होत्या. सामाजिक बांधिलकीचे उपाध्यक्ष शैलेश नाईक यांनी विनोद धुरी यांचे आभार मानले.